रत्नागिरी

मालगुंडचे ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक कृष्णा पवार यांचे निधन

गणपतीपुळे दि. १७ जुलै (वैभव पवार) :- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ब्रह्मटेकवाडी येथील रहिवासी तथा ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक कृष्णा रामजी पवार यांचे बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मालगुंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पवार गुरुजी या नावाने सर्वत्र परिचित असलेल्या कृष्णा पवार यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्षे सेवा बजावली. आपल्या प्रदीर्घ सेवा काळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले.मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत तब्बल 18 वर्षे सेवा दिली.

आपल्या प्रेमळ स्वभावामुळे, शिस्तप्रिय कार्यपद्धतीमुळे आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापनामुळे विद्यार्थी, पालक व सहकाऱ्यांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यानंतर भगवतीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदावरून ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यातील आपली नाळ कायम ठेवली. वाचनाची विशेष आवड असलेले पवार गुरुजी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत असत. प्रेमळ, मनमिळावू आणि सर्वांना आपलेसे करणारा त्यांचा स्वभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष पैलू होता. त्यांनी आयुष्यभर माणुसकीची नाती जपत समाजात आदराचे स्थान मिळवले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, माजी विद्यार्थी, मित्रपरिवार, हितचिंतक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

त्याच्या पश्चात दोन मुलगे महेश आणि मिलिंद, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबासह मालगुंड परिसराने एक आदर्श शिक्षक आणि सेवाभावी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button