रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील पायाभूत सुविधा बळकट होणार!

रत्नागिरी दि. ४ :- रत्नागिरी जिल्ह्यातील आवश्यक आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी तसेच नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी विधानभवन येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी खेड तालुक्यातील मौजे वावे, चिपळूण तालुक्यातील मौजे रामपूर तसेच गुहागर तालुक्यातील मौजे रामपूर येथील शासकीय रुग्णालयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीत खेड तालुक्यातील मौजे वावे येथील शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक निधी मंजुरी, वैद्यकीय उपकरणे, जागेची उपलब्धता तसेच इतर पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेत या कामासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच चिपळूण तालुक्यातील मौजे रामपूर येथील श्रेणीवर्धित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी किमान ६१ गुंठे जागेची आवश्यकता असून सध्या केवळ ३३ गुंठे जागा उपलब्ध आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीची सुमारे ४० गुंठे जागा उपलब्ध करून नवीन इमारत उभारण्याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीचे मदत घेण्याच्या सूचना दिल्या.
त्यासोबत गुहागर प्राथमिक आरोग्य केंद्रात जुनी इमारतीच्या जागी नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर करावा. तसेच आरोग्य सेवा संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य संस्थांशी संबंधित प्रश्नांचा विचार करून आवश्यक कामांसाठी विशेष बाब म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी आमदार भास्कर जाधव, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ. सुनीता गोलाईत, सहसंचालक राजेंद्र भालेराव तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरीचे जिल्हा शल्यचिकित्सक आणि कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक सहभागी झाले होते.



