
दापोली दि. ४ सप्टेंबर (सागर गोवळे) : नारळ बागायतदारांची झोप उडवणाऱ्या आणि अकाली फळगळीमुळे लाखो रुपयांचे नुकसान करणाऱ्या उंदरांच्या उपद्रवाला वेसण घालण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषी स्नेही’ गटाने थेट मैदानात उतरून धडक कारवाई केली आहे. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) उपक्रमांतर्गत वणोशी येथे नारळ पिकातील उंदीर व्यवस्थापनाचे थरारक आणि थेट प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांना संरक्षणाचा ‘मास्टरप्लाॅन’ देण्यात आला.

नारळाच्या झाडावर चढून फळे कुरतडणे, लहान रोपांचा कोंब नष्ट करणे आणि उत्पादनाचा बुरखा फाडणे या उंदरांच्या सवयींवर रोख ठोकण्यासाठी या प्रात्यक्षिकात अत्याधुनिक व सोपे उपाय दाखवण्यात आले.
उंदरांचा खात्मा करण्यासाठी कृषी स्नेही गटाचे ३ महत्त्वाचे वार:
गॅल्वनाइज्ड पत्र्याचा ‘सुरक्षा कवच’: जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर नारळाच्या खोडाभोवती ४५ सेंमी रुंदीचा गॅल्वनाइज्ड पत्रा बसवून उंदरांना झाडावर चढण्यापासून पूर्णपणे रोखण्याचा यांत्रिक अडथळा प्रत्यक्ष दाखवण्यात आला.
झिंक फॉस्फाइडचा विषारी विळखा: सुरक्षिततेचे कडक नियम पाळून शिफारशीनुसार झिंक फॉस्फाइडच्या विषारी आमिषाचा वापर कसा करावा, याचे थेट धडे देण्यात आले.
बागेची सर्जिकल स्ट्राइक स्वच्छता: वाळलेली पाने, करवंट्या आणि कचरा हटवून उंदरांचे अन्न व निवारा नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले. सोबतच नवीन लागवडीत २५ × २५ फूट अंतर ठेवण्याचा वैज्ञानिक सल्ला दिला.
कृषी स्नेही गटाच्या कु. समृद्धी जाधव, कु. आकांक्षा गाडगे, कु. श्रावणी मोरे, कु. तन्वी नादिवडेकर, कु. नीलम मदने, कु. कोमल झिरवाळ, कु. श्रुती बोबडे, कु. अंकिता मुंज, कु. सलोनी सावंत आणि कु. साक्षी लोके या विद्यार्थिनींनी या प्रात्यक्षिकाची कमान सांभाळली.
हे यशस्वी आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. बागेची नियमित पाहणी करून उंदरांचे बिळ दिसताच वेळेत प्रहार करा, असा सज्जड इशारा या वेळी बागायतदारांना देण्यात आला.



