मालगुंड येथील प्रतिष्ठित नागरिक दत्तात्रय उर्फ आप्पा केळकर यांचे निधन

गणपतीपुळे दि. ४ (वैभव पवार) :- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील प्रतिष्ठित नागरिक दत्तात्रय जनार्दन केळकर यांचे शुक्रवार दि. ३ जुलै २६ रोजी रात्रीच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
दत्तात्रय केळकर हे संपूर्ण मालगुंड गावात “आप्पा” या टोपण नावाने परिचीत होते. गेली अनेक वर्षे ते मालगुंड येथील स. गो. केळकर अँड सन्स या दुकानात कार्यरत होते. तसेच ते उत्तम आचारी होते. अनेक ठिकाणी ते त्यांच्या पत्नी सौ. दीपाली केळकर यांच्यासह केटरिंग सर्व्हिस देत असत. त्यामध्ये रुचकर चवीचे आणि अत्यंत स्वादिष्ट जेवण अनेकांच्या पसंतीस उतरत असे. तसेच जिलेबी सारखा गोड पदार्थ बनवण्यातही त्यांचा विशेष हातखंडा होता. राष्ट्रीय सणांच्या दिवशी त्यांनी बनवलेली जिलेबी मालगुंड, गणपतीपुळे परिसरात विशेष आवडीची आणि मोठ्या मागणीची ठरत असे. ते एक उत्तम रंगकर्मी होते. गावातील श्रीराम जन्मोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव यात होणारी नाटके त्यांनी अनेक वर्षे आपल्या उत्तम अभिनयाने गाजवली.
अतिशय नम्र, ऋजु स्वभावाचे व सर्वांशी मिळून मिसळून वागणारे आणि चेहऱ्यावर सदैव हास्य असणारे मायाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जात असे. त्यांच्या आकस्मिक निधनाने मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, चार मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययांत्रेप्रसंगी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि मालगुंड ,गणपतीपुळे,निवेंडी, वरवडे परिसरातील विविध ठिकाणचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



