
वनोशी तर्फे पंचनदी दि. ४ सप्टेंबर (सागर गोवळे) :- आरएडब्ल्यूई (RAWE) उपक्रमांतर्गत वनोशी तर्फे पंचनदी येथील श्री. मंदार देपोलकर यांच्या शेतावर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ विद्यार्थ्यांनी ‘कृषी सखी’ गटातील विद्यार्थिनींनी सुपारीच्या पिकावरील घातक ‘कोळेरोग’ (फळकूज) रोखण्यासाठी १% बोर्डो मिश्रण तयार करण्याचे धडाकेबाज प्रात्यक्षिक सादर केले.

सुपारी बागायतदारांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर मात करण्यासाठी योग्य प्रमाणात बोर्डो मिश्रण कसे तयार करावे, याचे प्रत्यक्ष सादरीकरण करून विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांची मने जिंकली.
असे बनवले १% बोर्डो मिश्रण:
साहित्य: १ किलो मोरचूद, १ किलो चुना, १०० लिटर पाणी आणि प्लास्टिकच्या बादल्या.
कृती: ५० लिटर पाण्यात १ किलो मोरचूद व दुसऱ्या ५० लिटर पाण्यात १ किलो चुना स्वतंत्रपणे विरघळवला. त्यानंतर चुन्याच्या द्रावणात मोरचूदचे द्रावण हळूहळू ओतून लाकडी काठीने ढवळत एकजीव, जंतूनाशक मिश्रण तयार केले.
महत्त्वाच्या सूचना व काळजी:
लोखंडी भांड्यांचा वापर टाळणे, द्रावणे स्वतंत्र तयार करणे आणि फवारणी करताना मास्क व हातमोजे वापरून ताज्या द्रावणाचाच वापर करणे का गरजेचे आहे, याचे मोलाचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
आयोजक व मार्गदर्शक:
या यशस्वी प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषी सखी गटातील विद्यार्थिनी कु. संजना जंगले, कु. शबरी चव्हाण, कु. मधुजा घडशी, कु. पायल मोरे, कु. रिंकू बाजीया, कु. तरला श्रीदेवी, कु. दिविलीयू, कु. देवीप्रिया पी. टी., कु. श्रीलया एम., कु. मुस्कान कसोटीया आणि कु. नित्या राज यांनी केले.
या उपक्रमाला सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुंकरकर, RAWE समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रभारी डॉ. विजय देसाई, विषय तज्ञ डॉ. परेश पोटफोडे, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे स्थानिक शेतकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे!



