रत्नागिरी येथील कऱ्हाडे ब्राह्मण संघात राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन

रत्नागिरी दि. २३ : १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढणाऱ्या अग्रणी सेनानी झांशीची महाराणी, विरांगना लक्ष्मीबाई स्मृतीदिनी रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघामध्ये अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई, कमिटी सदस्य सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, विवेक पुरोहित, उमेश आंबर्डेकर, सल्लागार मंडळ सदस्य डॉ. शरद प्रभुदेसाई, कार्यवाह सौ. शिल्पा पळसुलेदेसाई, सभासद संदीप भट, स्वरदा लोवलेकर आणि तृप्ती नितोरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी सांगितले की, झांसीच्या राणीच्या शौर्यामुळे आणि नेतृत्वामुळे त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून भारतीय जनमानसात सुप्रसिद्ध आहेत. राणी लक्ष्मीबाई यांना भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक मानले जाते. दोन्ही हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन, मुलाला पाठीवर बांधून त्या इंग्रजांशी लढल्या. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे दरवर्षी राणी लक्ष्मीबाई क्रीडा पुरस्कार देऊन शालेय क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थिनीला गौरवण्यात येते. तसेच शहर परिसरातील शाळेत झांशीच्या राणीच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शाळेसाठी पुस्तके व झांशीच्या राणीची प्रतिमा भेट व झांशीच्या राणीच्या चरित्राचे वितरण केले जाते.



