रत्नागिरी

भक्षाचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला आले यश

लांजा दि. २२ :- भक्षाचा पाठलाग करताना एका सार्वजनिक विहिरीत पडलेल्या अंदाजे दीड वर्ष वयाच्या नर बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे. लांजा तालुक्यातील इसवली पाथरवाडी येथे रविवारी (दि. २१) सकाळी ११:४० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वन विभागाने स्थानिकांच्या मदतीने अत्यंत वेगाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले.

मिळालेल्या माहितीनुसार, इसवली पाथरवाडी येथील लोकवस्तीत एक सार्वजनिक विहीर आहे. रविवारी सकाळी या विहिरीतून प्राण्यांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी विहिरीत डोकावून पाहिले. त्यावेळी विहिरीच्या पाण्यात एक बिबट्या पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

स्थानिक ग्रामस्थ अक्षय गुरव यांनी प्रसंगावधान राखत या घटनेची माहिती तातडीने वनविभागाला दिली. माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) यांना अवगत करण्यात आले आणि लांजा वनपरिमंडळाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

विहिरीत अडकलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या पथकाने दोरीच्या साहाय्याने एक लोखंडी पिंजरा विहिरीत सोडला. बिबट्या पिंजऱ्यात आल्यानंतर अत्यंत कौशल्याने त्याला तासाभराच्या आत विहिरीबाहेर काढण्यात आले. प्राथमिक तपासणीत हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे दीड वर्ष असल्याचे समोर आले.

लांजा येथील सहायक आयुक्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास अनुसे यांनी बिबट्याची सखोल वैद्यकीय तपासणी केली. बिबट्या पूर्णपणे सुदृढ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

सदर क्लिष्ट रेस्क्यू मोहीम विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत लांजाचे वनपाल धुळू कोळेकर, वनरक्षक नमिता कांबळे, कोर्ले वनरक्षक श्रावणी पवार यांच्यासह रेस्क्यू टीमचे अमित लांजेकर आणि सागर साळवी यांनी थेट सहभाग घेतला. तसेच इसवली गावचे पोलीस पाटील दत्ताराम आपणकर, सरपंच आणि सर्व ग्रामस्थांनी वन विभागाला मोलाचे सहकार्य केले.

वन विभागाचे आवाहन

“अशा प्रकारच्या वन्यजीव मानवी वस्तीत आल्याच्या घटना घडल्यास किंवा कोणतेही वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास नागरिकांनी स्वतः कोणताही धोका पत्करू नये. अशा वेळी वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९०९६५७८७६१ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.”

— श्रीमती गिरिजा देसाई (विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी-चिपळूण)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button