शिक्षणाअभावी सुरु केलेल्या व्यवसायातून घडविले उज्वल भविष्य!
कोसूंबच्या राजेंद्र पोटफोडेंची यशोगाथा; कल्हईसह विविध भांडयांना सुंदर आकार

संगमेश्वर दि. ५ ( प्रतिनिधी ):- घरचा पिढीजात भांड्याना आकार देण्याचा व्यवसाय ,आजोबा आणि वडिलांच्या हातून नव्याने घडविली जाणारी भांडी पाहून बालपणी ही कला म्हणजे जादूई वाटायची. हे सारं पहात असताना शाळेत जाण्याची आवड संपुष्टात आली. घरच्या दबावामुळे जेमतेम तिसऱ्या इयत्ते पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर हात भांडी तयार करण्याच्या कामाकडे वळले. कठोर परिश्रम, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर या व्यवसायात हातातील कलेच्या जोरावर उत्तम प्रगती करुन आज यश प्राप्त करणारे कोसूंब संगमेश्वर येथील राजेंद्र मनोहर पोटफोडे हे एक हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळखले जात आहेत.
राजेंद्र मनोहर पोटफोडे यांचा वडिलोपार्जित तांबट कामाचा व्यवसाय. हा व्यवसाय करायचा म्हणजे आधी हाताला चटके तेंव्हा मिळते भाकर…..! अशा प्रकारचा. राजेंद्र यांचे आजोबा त्यानंतर वडील यांनी हा व्यवसाय मोठया कष्टाने सुरु ठेवला. वडील करत असलेला व्यवसाय बालपणापासून पाहात असताना हा व्यवसाय पुढे कोणीतरी सुरु ठेवला पाहिजे यासाठी आपण हेच काम शिकायचं , असं राजेंद्र यांनी बालपणीच ठरवलं होतं. वडिलांना मदत करताना राजेंद्र यांना शिक्षणाची आवड नसल्याने त्यांनी शाळेची पायरी चढायची नाही,असं ठरवलं होतं. मात्र किमान अक्षर ओळख व्हावी म्हणून घरच्यांच्या जबरदस्तीमुळे जेमतेम तिसरी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर एक दिवस राजेंद्र यांनी तांबट कामाची हत्यारं हातात घेतली ती कायमसाठी.
राजेंद्र यांचा मोठा आणि लहान भाऊ चालक धंद्यात. वडिलांना व्यवसायात मदत करत असताना भविष्याचा विचार करता या व्यवसायातील आधुनिक शिक्षण घ्यावे,या उद्देशाने राजेंद्र यांनी १९८२ ते १९९१ पर्यंत कोल्हापूर येथे काम शिकून घेतलं. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे तांबट व्यवसायातील आधुनिक शिक्षण घेतलं तरंच परिस्थितीवर मात करता येईल अशी राजेंद्र यांची भावना होती. सन ९१ साली त्यांनी गावी कोसूंब येथे येवून आपला परंपरागत व्यवसाय सुरु केला. तांब्या – पितळेची भांडी घडविणे , भांडयाना कल्हई लावणे अशी कामं करताना राजेंद्र यांच्या कलेची ख्याती सर्वदूर पोहचली. या व्यवसायचं हळूहळू कारखान्यात रूपांतर झालं.
संसारोपयोगी भांडी बनवणं, मुस्लिम पद्धतीची भांडी घडविणे आणि ऑर्डर प्रमाणे भांडी तयार करुन देणं आणि अशा भांड्यांची विक्री करणं सुरु झालं. राजेंद्र यांनी या कलेत स्वतःची वेगळी छाप पाडली. विविध देवस्थानं आणि घरगुती अशा ऑर्डरमुळे राजेंद्र या कामात व्यस्त राहू लागले. पुणेसह विविध शहरातून राजेंद्र यांना नवीन भांडी घडविण्यासह कल्हई कामाच्या ऑर्डर मोठया प्रमाणावर मिळू लागल्या. त्यांनी आजवर हनुमंत गदा, शिवलिंग, अभिषेक पात्र, पणत्या, साळुंकी, नाग , पखवाज, दागिने पेटी, तांबे, भांडी, ताटे अशी विविध तांब्याची भांडी मंदिरांसाठी घडवून दिली. तसेच विविध भांडयांना पॉलिश करून देण्याचे काम देखील राजेंद्र हे आपल्या कारखान्यात करत असतात. भांडी घडवताना कितीही चटके बसले आणि भट्टी जवळ काम करताना आगीजवळ सामना करत राजेंद्र यांनी या व्यवसायात कौशल्य आणि यश प्राप्त केले आहे. आपल्या कलेच्या जोरावर राजेंद्र यांचे नांव सर्वदूर पोहचलं आहे. राजेंद्र पोटफोडे या कलाकाराजवळ ९६७३५५३९६० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.


