बीएसएनएलच्या ‘टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्स’चा गौरव
जिल्ह्यात ५६०० हून अधिक FTTH कनेक्शन्स कार्यरत

रत्नागिरी, दि. ५ :- भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) रत्नागिरी कार्यालयातर्फे नुकतीच एक विशेष व्यावसायिक विकास बैठक (Business Development Meeting) उत्साहात पार पडली. या बैठकीमध्ये बीएसएनएलच्या यशस्वी वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ‘टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्स’चा (TIP) विशेष सत्कार करण्यात आला. वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षात हाय-स्पीड इंटरनेट पुरवणाऱ्या FTTH (फायबर टू द होम) सेवेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्र परिमंडळात उत्कृष्ट कामगिरी बजावत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यासोबतच, बीएसएनएलच्या दीप्ती पंडित यांनी ‘एफएम नोडल’ (FM Nodal) म्हणून उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण महाराष्ट्रात तृतीय क्रमांक मिळवला.
या यशात बीएसएनएलच्या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्सचा (TIP) अत्यंत मोलाचा वाटा राहिला आहे. या यशाची दखल घेत बीएसएनएल रत्नागिरीच्या उपमहाप्रबंधक (प्रचालन) अमृता लेले यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भागीदारांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये खालील उद्योजकांचा समावेश आहे:
प्रथम क्रमांक: श्रीशा एंटरप्रायझेस (विकास संगरे, रत्नागिरी)
द्वितीय क्रमांक: महापुरुष एंटरप्रायझेस (नीलेश (राजू) पेडणेकर, संगमेश्वर)
या दोन्ही भागीदारांनी मिळून वर्ष २०२५-२६ मध्ये रत्नागिरी आणि संगमेश्वर भागात जवळपास ४०० हून अधिक नवीन FTTH कनेक्शन्स देऊन बीएसएनएलची सेवा घराघरांत पोहोचवली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक
या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील बीएसएनएलचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच कोल्हापूर येथील महाप्रबंधक अरविंद पाटील आणि मुंबई येथील मुख्य महाप्रबंधक कार्यालयाच्या उपमहाप्रबंधक (FTTH) कल्पना पटेल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Virtual Conference) या कार्यक्रमात सहभाग घेतला. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरस्कारप्राप्त भागीदार आणि रत्नागिरी टीमचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवीन उद्योजकांना व नागरिकांना आवाहन
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या बीएसएनएलची ५६०० पेक्षा अधिक FTTH कनेक्शन्स यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बीएसएनएल रत्नागिरीतर्फे स्थानिक उद्योजकांना ‘टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर’ (TIP) म्हणून बीएसएनएलसोबत जोडून घेऊन व्यवसायाच्या नवीन संधी शोधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी बीएसएनएलच्या ‘फायबर टू द होम’ (FTTH) या हाय-स्पीड आणि विश्वासार्ह इंटरनेट सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
बीएसएनएलच्या या भागीदारी योजनेबद्दल किंवा नवीन इंटरनेट कनेक्शन संदर्भात कोणत्याही चौकशीसाठी दीप्ती पंडित यांच्याशी ९४२२७८९२१२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.



