तुरळ येथे फासकीत अडकून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू; अज्ञात शिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

संगमेश्वर दि. ३१ :- तालुक्यातील मौजे तुरळ (हारेकरवाडी) येथे एका खैराच्या झाडाला लावलेल्या शिकारीच्या लोखंडी फासकीत अडकून एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यालगत असलेल्या झाडाला हा बिबट्या मृत अवस्थेत लोंबकळत असताना शनिवारी (३० मे) सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी वन विभागाने अज्ञात व्यक्तीविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तुरळ-हारेकरवाडी येथून माखजनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला बिबट्या अडकल्याची माहिती तुरळच्या पोलीस पाटलांनी शनिवारी सकाळी ९:०० वाजता वन विभागाला दूरध्वनीवरून दिली. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी यांच्या सूचनेनुसार वनपाल आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ आवश्यक साहित्यासह घटनास्थळी धाव घेतली.
झालेल्या तपासणीत, रस्त्यालगतच्या खैराच्या झाडाला लावलेल्या शिकारीच्या तारेच्या फासकीत बिबट्या अडकला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता. वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला अडकलेली फासकीची तार सोडवून, खैराच्या झाडाच्या खुंटासहित ती तार आपल्या ताब्यात घेतली. मृत बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे वन विभागाने सांगितले.
कडवई येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांना पाचारण करून मृत बिबट्याचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वरिष्ठांच्या उपस्थितीत सर्व अवयवांसह बिबट्याचा मृतदेह अग्नी देऊन नष्ट करण्यात आला. या संदर्भात संगमेश्वर देवरुखचे वनपाल यांनी वन गु. रि. क्रमांक १९/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई रत्नागिरी (चिपळूण) येथील विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. घटनास्थळी रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी श्री. विक्रम गुरव, संगमेश्वर देवरुखचे परिमंडळ वनाधिकारी श्री. सागर गोसावी, वनरक्षक श्रीमती सुप्रिया काळे (दाभोळे), श्री. सुरज तेली (आरवली), श्री. सहयोग कराडे (साखरपा) आणि स्थानिक पंच उपस्थित होते.
वन विभागाचे आवाहन
अशा प्रकारे वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी फासकी लावणे हा गंभीर आणि कायदेशीर गुन्ह्याचा भाग आहे. नागरिकांना आपल्या परिसरात अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली किंवा फासक्या लावल्याचे आढळल्यास, तसेच कोणताही वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास तात्काळ वन विभागाच्या खालील क्रमांकांवर संपर्क साधावा: टोल फ्री क्रमांक: १९२६, भ्रमणध्वनी क्रमांक: ९०९६५७८७६१.



