रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची अवैध शस्त्रांविरोधात प्रभावी कारवाई
५ गुन्हे उघडकीस, ८ आरोपींवर कारवाई; ७ अवैध शस्त्रे व २९ जिवंत काडतुसे जप्त

रत्नागिरी दि. ३१ :- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची अवैध शस्त्रांविरोधात प्रभावी कारवाई करताना ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी ८ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, ७ अवैध शस्त्रे व २९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात यश पोलिसांना आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध शस्त्रांच्या बेकायदेशीर वापरास प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सन 2026 मध्ये जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
सन 2026 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे व वापरणे यासंदर्भात एकूण 05 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस पथकांनी प्रभावी माहिती संकलन, छापेमारी व तपासाच्या माध्यमातून यशस्वी कारवाई केली आहे.
या कारवायांदरम्यान एकूण 08 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम, 1959 (Arms Act, 1959) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांमार्फत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवायांमध्ये आरोपींकडून एकूण 07 अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये 05 सिंगल बॅरल काडतुसी बंदुका, 01 ठासणीची बंदूक व 01 लोखंडी गावठी कट्टा यांचा समावेश आहे. याशिवाय 29 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, त्यामुळे संभाव्य गंभीर गुन्हे घडण्यापूर्वीच त्यांना प्रतिबंध करण्यात यश आले आहे. तसेच, या सर्व कारवायांमध्ये एकूण रु 2,28,330/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध शस्त्रे आणि जीवंत काडतुसे जप्त केल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना कायद्याचा प्रभावी धाक निर्माण झाला आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दला मार्फत अवैध शस्त्र बाळगणे, विक्री करणे किंवा वापरणे यांच्या विरोधात कठोर धोरणाचा अवलंबत करण्यात येत आहे तसेच भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा, छापेमारी व प्रतिबंधात्मक कारवाया अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी स्पष्ट केले आहे.



