महाराष्ट्ररत्नागिरी

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची तावडे अतिथी भवन, महाकाली मंदिरास भेट

रत्नागिरी दि. १४ : मुंबईच्या महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच सौ. रितू तावडे यांनी आपल्या मूळ गावी आडिवरे येथे भेट दिली. या वेळी तावडे वाड्यात झालेल्या पारंपरिक स्वागताने आणि ग्रामस्थांच्या प्रेमळ स्नेहाने वातावरण भावुक झाले. क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

महापौर म्हणून गावच्या लेकीचे स्वागत करण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक औक्षण, आपुलकीने केलेली विचारपूस आणि मिळालेला आशीर्वाद यामुळे रितू तावडे भावुक झाल्या. त्यांच्यासमवेत पती राजेश तावडे, मुलगा यश तावडे आदी आले होते. “दिवसभर जनसामान्यांचे प्रश्न, बैठका आणि विकासकामांचा धडाका यामध्ये मन आणि शरीर दोन्ही गुंतलेले असते. आज तावडे अतिथी भवनास सहकुटुंब भेट दिल्याने मनाला एक वेगळीच उभारी मिळाली. येथे श्री सप्तकोटीश्वराचे आणि श्री महाकालीचे आशीर्वाद घेतले. आज येथून मिळणारा आशीर्वाद जनसेवेसाठी अधिक बळ देणारा आहे, अशी भावना सौ. रितू तावडे व्यक्त केली.

सौ. रितू तावडे आडिवरे येथील तावडे अतिथी भवन येथे वास्तव्यास होत्या. तावडे अतिथी भवनातील समस्त तावडे यांचे कुलदैवत श्री सप्तकोटीश्वराच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाल्या. भवनाच्या आवारात श्री सप्तकोटीश्वराचे मंदिर उभारण्यात येत आहे. तावडे अतिथी भवनाची निर्मिती व मंदिराच्या निर्माणविषयीची इत्थंभूत माहिती या भवनाचे शिल्पकार आर्किटेक्ट संतोष तावडे यांच्याकडून सौ. रितू तावडे यांनी जाणून घेतली.

या भेटीबद्दल आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले “क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळासाठी आणि सर्व तावडे कुटुंबियांसाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि भावस्पर्शी असा क्षण ठरला. मुंबईसारख्या महानगराच्या महापौरपदी विराजमान असलेली आपल्या तावडे कुळातील एक स्नुषा एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या स्थानावर असूनही आपल्या मुळांशी, आपल्या समाजाशी आणि आपल्या कुलदैवतांशी इतक्या आत्मीयतेने जोडलेली आहे, ही बाब आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आणि मनाला अत्यंत सुखावणारी आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button