रत्नागिरी

एमआयडीसीने प्रलंबित जोडण्याबाबत आढावा घ्यावा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

ग्रामसेवकांनी गरीब गरजूंना पाणी दिले पाहीजे

रत्नागिरी, दि. १६ : शिरगाव, नाचणे, मिरझोळे, खेडशीच्या गरीब, गरजू ग्रामस्थांना पाणी पुरवठा जोडण्या दिल्या पाहिजेत. एमआयडीसी मार्फत ग्रामपंचायतींना पाणी पुरविले जाते. ग्रामसेवकांनी नळ जोडण्या प्रलंबित ठेवता कामा नयेत. त्याबाबत एमआयडीसीने दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शिरगाव, नाचणे, मिरझोळे, खेडशी ग्रामपंचायत पाणी पुरवठ्याच्या अडीअडचणीबाबत व नळपाणी जोडणी संदर्भात आज पालकमंत्री डॉ. सामंत यांनी बैठक घेतली.

मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गटविकास अधिकारी चेतन शेळके, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सतीश पोवार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, एमआयडीसीने आणि जिल्हा परिषदेने आढावा घेवून ग्रामसेवकांवर जबाबदारी निश्चित करावी. पाण्यापासून ग्रामस्थांना वंचित ठेवायचे नाही. लोकांना पाणी देताना पैशाचा व्यवहार करु नका. ते पाप आहे. त्यांना हेलपाटे मारायला लावू नका. प्रलंबित जोडण्या त्वरित द्या.

एमआयडीसी मध्ये ज्या ठिकाणी अनधिकृत नळ जोडण्या असतील, त्यांना नोटीस देवून पैसे भरुन द्या. बिले नियमित घ्या अन्यथा त्या तोडून टाका. आठ दिवसात कारवाई करुन मागील थकबाकी वसूल करावी.

सोयी सुविधा दिल्याशिवाय प्रांतांनी इमारत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला विकासकांना देवू नये. जिल्ह्यातील ज्या ज्या एमआयडीसीमध्ये अनधिकृत बांधकामे झालेली असतील, ती त्वरित निर्मूलन करावीत, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिली. यावेळी संबंधित गावचे सरपंच सदस्य, ग्रामसेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button