रत्नागिरीसामाजिक

भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र (पुणे) आणि स्कॉन प्रो. फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम पायांची भेट

२४ मे रोजी रत्नागिरीत मोजमाप शिबिर

रत्नागिरी दि. १५ : भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र (पुणे) आणि स्कॉन प्रो. फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम पाय दिव्यांगांना देण्यात येणार आहेत. यासाठी रत्नागिरीत मे महिन्यात एका मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्वस्त विनय खटावकर, शिबिर समन्वयक ॲड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२४ मे रोजी साळवी स्टॉप येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मोजमाप शिबिर होईल. याद्वारे ३०० गरजू दिव्यांगांना उच्च दर्जाचे आधुनिक ‘मॉड्यूलर’ कृत्रिम पाय मोफत दिले जाणार आहेत. यापूर्वी अशी शिबिरे चिपळूण, मार्गताम्हाणे येथे आयोजित केली होती. ३०० हून अधिक दिव्यांग आले, तरीही त्यांना पाय मोफत देण्याची तयारी ठेवल्याचे यावेळी सांगण्यात आले.

श्री. खटावकर यांनी आधुनिक मॉड्यूलर तंत्रज्ञानाचे महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, बाजारात या आधुनिक कृत्रिम पायांची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, मात्र स्कॉन प्रो. फाउंडेशनच्या सामाजिक निधीतून हे पाय पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत. हे पाय पारंपरिक जयपूर फूटपेक्षा अत्यंत वेगळे आणि प्रगत आहेत. वजनाने हलके आणि ‘ऑटोफोल्ड’ सुविधा असलेले हे पाय बसवल्यानंतर व्यक्ती केवळ चालूच नव्हे तर धावणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालवणे आणि शेतीची कष्टाची कामे देखील सहजपणे करू शकतात. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे दिव्यांग व्यक्तीचे परावलंबित्व संपून ती सन्मानाने स्वावलंबी जीवन जगू शकणार आहे.

भारत विकास परिषदेचे पुण्यातील केंद्र गेल्या २५ वर्षांपासून सुरू असून दरवर्षी सुमारे ५ हजार दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि कॅलिपरचे वाटप करते. एप्रिल २०२५ मध्ये एकाच शिबिरात ८९२ दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून या केंद्राने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रमाची नोंद केली आहे.

रत्नागिरी जिल्हा, कोकण किनारपट्टी आणि गोवा परिसरातील दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून नोंदणीसाठी श्री. कुलकर्णी (९३७१०८८९११) किंवा श्री. संजीव (७०२८०४५९५५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्कॉन प्रो. उद्योग समूहातर्फे शिबिराच्या ठिकाणी येणाऱ्या दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहायकांसाठी मोफत भोजन, चहाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी राहुल पुरकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button