हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत आंबा बागायतदारांना अपुरी – राजू शेट्टी

रत्नागिरी दि. १२ : –राज्य सरकारने आंबा बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर आंबा बागायतदारांचा एल्गार दाखवून सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशाराही त्यांनी दिला.
देवगड येथे आयोजित आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या एल्गार सभेत ते बोलत होते. शेट्टी पुढे म्हणाले की, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी काही महिन्यांतच बजेट २५ हजार कोटींवरून ३५ हजार कोटींवर नेले जाते, तसेच ‘शक्तीपीठ महामार्गा’सारख्या प्रकल्पासाठी कोट्यवधींची तरतूद केली जाते, मग महाराष्ट्राचा कणा असलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारकडे निधी का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत ही ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असल्याची टीकाही त्यांनी केली.
बदलत्या हवामानामुळे मोहोर गळणे व फळगळतीमुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. एका हेक्टरमागे मशागत, कीटकनाशक फवारणी व मजुरीचा खर्च लाखोंमध्ये जात असताना ही मदत अत्यंत अपुरी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार बाळासाहेब माने म्हणाले की, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी मागील महिनाभरापासून न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी मेळावे, मोर्चे आणि रास्ता रोको आंदोलनांच्या माध्यमातून हेक्टरी पाच लाख रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात येत आहे.
पुढील आठवड्यात १८ एप्रिल रोजी रत्नागिरी येथे शेतकरी मेळावा घेऊन मुंबईत भव्य मोर्चाची घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील शेतकऱ्यांना एकत्र करून सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या सभेला प्रगतशील आंबा बागायतदार सुधीर जोशी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, सुशांत नाईक, गणेश गावकर, काका ढोके, किरण टेंभुलकर, प्रशांत शिंदे, अजय तेली, तुषार पालेकर, सागर जोईल तसेच देवगड तालुका आंबा बागायतदार संघाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



