रत्नागिरी

जागतिक ऑटीझम जागरुकता दिनानिमित्त “आस्था”कडून जनजागृती

रत्नागिरी दि. २ :- २ एप्रिल जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाच्या निमित्ताने आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेकडून रत्नागिरी बस स्थानक येथे स्वमग्नता अर्थात ऑटीझम म्हणजे काय आहे? हे सोप्या शब्दात व चित्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कळेल या साठी पोस्टर तयार करण्यात आले होते. आज या जनजागृती कार्यक्रमाचे उदघाट्न कुमार आल्हाद सुरेखा पाथरे यांच्या हस्ते करण्यात आले. आस्थाच्या सचिव सुरेखा पाथरे यांनी ऑटिझमच्या लक्षणांची माहिती दिली.

तसेच पालकांनी आपल्या मुलांमधील या लक्षणांकडे लवकरात लवकर पालक म्हणून लक्ष दिल्यास व शक्य तितक्या लवकर थेरपी उपचार सुरु केल्यास मुलांना वयानुरूप वाढ आणि विकासाचे टप्पे गाठता येतात. त्यामुळे मुल खुप चंचल असेल, वयानुरूप बोलत नसेल, स्वतःमध्येच मग्न राहत असेल, इतर मुलांमध्ये मिसळत नसेल तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. अशा बालकांसाठी आस्था मध्ये सर्व प्रकारचे सल्ला समुपदेशन व थेरपी उपचार उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये डीईआईसी येथे देखील मुलांसाठी सेवा उपलब्ध आहे. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. विजेता मोर्ये यांनी देखील सहभाग घेतला.

आस्थाच्या कार्यकर्त्यांनी ऑटीझमचे माहिती पत्रके बस स्थानकात व परिसरात माहिती देत वितरित केले आणि ऑटिझम असलेल्या मुलांचा आपण स्वीकार करून समजून घेऊन, आधार व प्रेम देण्याची, सामावून घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. या उपक्रमात संस्थेच्या हेल्प लाईन जिल्हा समन्वयक श्री. संकेत चाळके,थेरपी सेंटर प्रमुख श्रीम. संपदा कांबळे, कार्यकर्ते, पालक व मुले सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button