राजापुरातील मौजे- जुवाठी शिर्केवाडी येथे विहिरीत आढळला बिबट्या

रत्नागिरी दि. १ :- राजापूर तालुक्यातील मौजे- जुवाठी शिर्केवाडी येथील श्री. रामचंद्र नारायण भारती यांचे मालकीचे विहिरीत वन्यप्राणी बिबट्या पडला असल्याची माहिती सकाळी ९ वाजता पोलीस पाटील जुवाठी यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनी वरून दिली. सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली असता बिबट्या विहिरीमध्ये असलेल्या दगडावर बसला असल्याचे दिसून आले.
विहिरीची उंची सुमारे ३५-४० फूट होती. सकाळी 11.05 वाजता पिंजरा दोरी बांधून विहिरीत सोडून बिबट्याला सकाळी 11.09 वाजता चार मिनीटात सुस्थितीत पिंजऱ्यात जेरबंद करुन ताब्यात घेतला. नंतर पशूधन विकास अधिकारी राजापूर डाॅ. श्री. वेर्लेकर यांचेकडून बिबट्याची तपासणी केली असता, सदर बिबट्या सुस्थितीत असलेची खात्री त्यांनी केली. सदर बिबट्या हा मादी जातीचा असून तिचे वय सुमारे दीड ते दोन वर्ष आहे. त्यानंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम. गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीम. प्रियांका लगड, वनक्षेत्रपाल रत्नागिरी श्री. प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्यास त्याचे नैसर्गिक अदिवासात मुक्त करण्यात आले.
सदर कामगिरीसाठी वनक्षेत्रपाल श्री.प्रकाश सुतार, वनपाल राजापूर श्री. जयराम बावदाणे, वनरक्षक राजापूर श्री. विक्रम कुंभार व रेस्क्यू टीमचे श्री. दीपक चव्हाण, श्री. निलेश म्हादये, श्री. नितेश गुरव, श्री. संदीप जाधव, श्री. साहील जांगळी व ग्रामस्थ उपस्थित होते अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने मा. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम. गिरिजा देसाई यांनी केली आहे.



