
रत्नागिरी दि. २८ : येथील देव, घैसास, कीर (डीजीके) कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात संगमेश्वरी बोलीचे कलाकार, लेखक आनंद बोंद्रे यांच्या सादरीकरणाने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. देवरुखच्या श्री. बोंद्रे यांनी संगमेश्वरी बोलीत गाऱ्हाणे घातले आणि कोकण प्रदेशाची वैशिष्ट्य सांगणारे गीत सादर केले. कोकणच्या ग्रामीण लोककला आणि संगमेश्वरी बोलीतील गमतीजमती मनोरंजक पद्घतीने सांगितल्या.

मराठी विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कवी कुसुमाग्रज जन्मदिन आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गावसंस्कृती आणि मराठीची बोली या विषयावर श्री. बोंद्रे यांनी सादरीकरण केले. कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शुभांगी पोटे हिने विद्यार्थिनीने मराठी भाषागीत गायिले. मराठी विभाग प्रमुख प्रा. समिक्षा पालशेतकर यांनी प्रास्ताविक केले. प्र. प्राचार्या आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला उपप्राचार्या वसुंधरा जाधव, कला शाखा प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, विज्ञान शाखा प्रमुख प्रा. वैभव घाणेकर, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. राखी साळगावकर, प्राध्यापक आणि सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन निलाक्षी राऊत (प्रथम वर्ष कला) हिने केले. पलक वाघेला (तृतीय वर्ष कला) हिने आभार मानले.



