जिल्हा परिषद शाळा रानपाट येथे माजी विद्यार्थी संघाचा मेळावा संपन्न

तरवळ दि. २७ (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रानपाट येथे माजी विद्यार्थी मेळावा शाळेचे मुख्याध्यापक सुहास भितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी विद्यार्थी संघ रानपाटचे अध्यक्ष मयूर मुरलीधर गोनबरे यांनी यशस्वी नियोजन करून माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले. आणि मोठ्या उत्साहात वातावरणात मेळावा संपन्न झाला.
या विद्यार्थी मेळाव्याला रत्नागिरी पंचायत समितीचे नूतन सभापती प्रवीण पांचाळ आणि रत्नागिरी डाएटच्या वरीष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मेळाव्याची सुरुवात दीपप्रज्वलन व थोर नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली. त्यानंतर या मेळाव्याला उपस्थित असलेले रत्नागिरी पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रवीण पांचाळ व डायट च्या अधिव्याख्याता दीपा सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या दिमाखदार सोहळ्यात पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रवीण पांचाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समस्त रानपाट वासियांना एकत्र येऊन मेळावा सादर केल्याबद्दल धन्यवाद देत शाळेच्या दुरुस्तीसाठी तीन लाख रुपये मंजूर केल्याचे जाहीर केले. व शाळेसाठी येणाऱ्या काळात प्रत्येक भौतिक सुविधांसाठी व त्यांच्या पूर्ततेसाठी सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले. तसेच शाळेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असू अशी ग्वाही दिली.
डाएटच्या अधिव्याख्याता सौ. सावंत यांनी मार्गदर्शन करताना माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाण घेवाणीतून अनेक समस्या सोडवता येऊ शकतात हे लक्षात आणून दिले. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आणि एकंदर उत्साही वातरणाबाबत समाधान व्यक्त केले.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मयूर गोनबरे यांनी संघ स्थापनेचा उद्देश समजावून देताना शाळेच्या आवश्यक भौतिक सुविधांच्या गरजांची माहिती दिली. त्यानुसार “जय महाराष्ट्र कला पथक रानपाट” कडून शाळेला ४३ इंची स्मार्ट टी. व्ही. देणगी स्वरूपात देणार असे या कार्यक्रमात जाहीर करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांमधून प्रकाश मोर्यें आणि प्रदीप गोनबरे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रसंगी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. प्रणाली गोनबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्टरीत्या सुनील सखाराम गोनबरे माजी विद्यार्थी तथा पोलीस पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



