रत्नागिरी

बेघर निवारा केंद्र, वसतिगृह, शिवभोजन, अनाथ आश्रमांमध्ये तातडीने गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत

ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांची मागणी : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन सादर

रत्नागिरी दि. १८ :- शालेय पोषण आहार, शिवभोजन, बेघर निवारा केंद्र, वसतिगृह तसेच अनाथ आश्रमांमधील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून याठिकाणी तातडीने गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित एजन्सींना द्यावेत, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले असून यावर तातडीने पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

युवासेनेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की “रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाने गॅस सिलेंडरची टंचाई नसल्याचे घोषित केले असले, तरी घरगुती व व्यावसायिकांना गॅसचा तुटवडा जाणवत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रत्येक तालुक्यातील दुकानांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या आहेत. काही ठिकाणी हॉटेल्स व साधी उपहारगृह बंद पडली आहेत. काही व्यावसायिकांनी चुली पेटवल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहे. अशा परिस्थितीत शालेय पोषण आहार, शिवभोजन, बेघर निवारा केंद्र, वसतिगृह तसेच अनाथ आश्रम मधील परिस्थिती आपण स्वतः लक्ष घालून हाताळावी.”

सुचविलेल्या सर्व ठिकाणी तातडीने गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित एजन्सींना द्यावेत, अशी मागणी या निवदेनाद्वारे केली आहे.

यावेळी जिल्हा युवाधिकारी श्री. सावंत यांच्यासमवेत युवासेना शहर प्रमुख आशिष चव्हाण, नाचणे विभाग समन्वयक रितेश लोखंडे, शिवसेना शाखाप्रमुख प्रसाद रायंगणकर, ओमकार कारेकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button