क्रीडारत्नागिरी

मांडकी जि.प. शाळेचे लंगडी स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपद कायम!

डेरवण युथ गेम्स मध्ये दरवर्षी सहभाग

संगमेश्वर दि. २ ( प्रतिनिधी ):- चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद मांडकी शाळेने लंगडी स्पर्धेत गेली दहा वर्षे विजेतेपद कायम ठेवल्याची गौरवास्पद नोंद डेरवण येथील “यूथ गेम्स” स्पर्धेत झाली आहे तसेच या शाळेचा अथर्व राजेंद्र धुमक याला यावर्षी उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले आहे.

तालुक्यातील मांडकी येथील जिल्हा परिषद शाळेने यावर्षी डेरवण येथील लंगडी स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून त्यासाठीचे रोख १२ हजार रुपयांचे पारितोषिकही मिळवले. गेली १० वर्षे या शाळेतील विद्यार्थी लंगडी स्पर्धेसाठी येत आहेत. खरंतर जिल्हा परिषद शाळेतील मुलांना अशा स्पर्धांसाठी कोणी प्रोत्साहित करीत नाहीत, मात्र गेली २२ वर्षे या शाळेत अध्यापनाचे काम करणारे शिक्षक रवींद्र घाणेकर, सन २०१४पासून कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका मीना विचारे, सन २०२२पासून असलेल्या विद्या कसबेकर व नुकतेच सेवानिवृत्त झालेले पदवीधर शिक्षक दत्तात्रेय नार्वेकर या चौघाही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या क्रीडा प्रकारात तरबेज करताना शाळासुद्धा गुणवत्तेत अग्रेसर ठेवली आहे.

डेरवण येथील लंगडी स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांमध्ये चिपळूण युनायटेड गुरुकुलने द्वितीय क्रमांक व रोख ९ हजार रुपयांचे पारितोषिकही मिळविले. १५ वर्षांखालील मुलींमध्ये पुणे ईगल्सने प्रथम क्रमांक व रोख १२ हजार रुपयांचे पारितोषिक, तसेच रत्नागिरीच्या शिर्के हायस्कूलने द्वितीय क्रमांक व रोख ९ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. या स्पर्धेत पुणे विभागाची तेजल नितीन सोनार ही उत्कृष्ट खेळाडू ठरली. तसेच १२ वर्षांखालील मुलांमध्ये पुणे येथील रमणबाग यांनी प्रथम क्रमांक व रोख १२ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले, तर चिपळूणच्या गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलने द्वितीय क्रमांक व रोख ९ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.

या स्पर्धेत पुणे रमणबागचा विराज निलेश देशमुख हा उत्कृष्ट खेळाडू ठरला. स्पर्धेतील १२ वर्षांखालील मुलींमध्ये रत्नागिरीच्या शिर्के हायस्कूलने प्रथम क्रमांक व रोख १२ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले, तर चिपळूणच्या गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलने द्वितीय क्रमांक व रोख ९ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत रत्नागिरी हायस्कूलची जान्हवी प्रकाश झोरे ही उत्कृष्ट खेळाडू ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button