रत्नागिरीसामाजिक

डॉ. यश वेलणकर यांचे ‘वार्धक्यातील विस्मरण, विविध कारणे आणि प्रतिबंध’ या विषयावर व्याख्यान संपन्न

श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखचा उपक्रम

देवरुख दि. २७ ( प्रतिनिधी ):- श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख येथे ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने सुप्रसिद्ध सायकोथेरेपीस्ट व समुपदेशक डॉ. यश वेलणकर, मुंबई यांचे ‘वार्धक्यातील विस्मरण, विविध कारणे आणि प्रतिबंध’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाला देवरूख परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्तम सहभाग लाभला होता.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने मान्यवरांनी केली. यानंतर प्रमुख वक्ते डॉ. वेलणकर यांचा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. जी. के. जोशी यांनी स्वागत करून यथोचित सत्कार केला. यानंतर प्रा. जोशी यांनी देवरुख मधील दोन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष केशव नार्वेकर व प्रकाश घस्ते यांचेही स्वागत करून सन्मानित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रमुख अतिथींचा परिचय ग्रंथपाल सौ. श्रद्धा आमडेकर यांनी करून दिला. वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. जी. के. जोशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. यश वेलणकर यांना व्याख्यानासाठी याल का असे विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता अवश्य येईन असे सांगितले याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.

डॉ. यश वेलणकर यांनी ‘वार्धक्यातील विस्मरण, विविध कारणे आणि प्रतिबंध’ या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधताना विस्मरण म्हणजे काय? हे सांगितले. विस्मरणाचे दोन प्रकार सविस्तर स्पष्ट केले. विस्मरण प्रत्येक माणसाला का आवश्यक आहे, याची रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन विस्मरणाची आवश्यकता विशद केली. विस्मरणाची कारणे सांगून त्यावर उपायही सुचविले. वार्धक्यातील विस्मरण व सर्वसाधारण व्यक्तींमधील विस्मरण यामधील फरक विविध उदाहरणांसह स्पष्ट केला. वार्धक्य व अल्झायमर यामधील फरक व लक्षणे विशद केली.

अल्झायमरमधील तीन टप्पे विशद करताना, स्मृतीचे विविध प्रकार उदाहरणांसह सांगितले. अल्झायमर हा आजार मृत्यूचे कारण होऊ शकतो, त्यामुळे तो प्राथमिक अवस्थेत कसा ओळखायचा याबाबतची माहिती दिली. हा आजार कळला तर औषध उपचार व आहाराने त्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते असे प्रतिपादन केले. याबाबतच्या उपचार पद्धती विशद केल्या. उपचार सांगताना पाच कृती अवश्य कराव्यात असे याप्रसंगी सर्वांना आवाहन केले. यामध्ये शारीरिक हालचाल, शारीरिक व मेंदूच्या आरोग्यासाठी व्यायाम, नवीन शिकणे; नवीन माहिती घेणे व नवीन कौशल्य प्राप्त करणे, नवीन माणसांशी ओळख व नवीन नाती जोडणे, आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला देणे आणि वर्तमान क्षणात आनंदाने जगणे यांचा समावेश होता.

व्याख्यानाच्या समारोपानंतर डॉ. वेलणकर यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना सोप्या भाषेत व समर्पक उत्तरे दिली . कार्यक्रमाचा समारोप अध्यक्ष प्रा. जी. के. जोशी यांनी केला. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक ग्रंथपाल अमृता इंदुलकर, अर्चना राणे आणि सहाय्यक नरेंद्र खेडेकर यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button