सैतवडे प्रशालेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी मार्फत करिअर गाईडन्स कार्यक्रम संपन्न

तरवळ दि. १४ (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक संस्था सैतवडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे या प्रशालेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचे मार्फत विद्यार्थ्यांसाठी करिअर पर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरीचे तज्ज्ञ मार्गदर्शक संतोष पावसकर व एस. व्ही.सांगळे यांचे शालेय विदयार्थिनींनी बनविलेले सुबक असे बुके देऊन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक संतोष चव्हाण व कलाध्यापक रमेश गंधेरे यांनी स्वागत केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरीचे तज्ज्ञ मार्गदर्शक संतोष पावसकर व एस. व्ही.सांगळे यांनी मार्गदर्शन करताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरु असलेले विविध कोर्सेस, त्यातून करिअरच्या संधी, कॅटॅगरीप्रमाणे ॲडमिशन साठी लागणारी विविध कागदपत्र त्यांची उपलब्धता कधी आणि कशी करावी, त्यांचा ॲडमिशनसाठी होणारा लाभ, ड्रॉईंग ग्रेड परीक्षा, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या सर्टिफिकेटचा होणारा फायदा यांसारख्या अत्यंत मौलिक गोष्टींची माहिती देऊन औद्योगीक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी (ITI) ला प्रवेश घेणे सोपे करून दिले आहे.
तसेच भविष्यातील रोजगारासाठी कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत या बद्दल ही माहिती दिली. तसेच iti च्या माध्यमातून भविष्यात रोजगार मिळण्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे ही आवर्जून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी विशेषतः १० वी च्या विद्यार्थ्यांनी याचा भविष्यात उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले. या विशेष मार्गदर्शन पर शिबिराचा लाग प्रशालेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन जाधव सरांनी केले तर आभार ज्येष्ठ शिक्षक संतोष चव्हाण यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नसिम शेकासन , कलाध्यापक रमेश गंधेरे, विज्ञान शिक्षिका संज्योत खेडेकर , शोझब चिकटे, रविंद्र लवंदे यांचे बरोबर विद्यार्थी वर्गानेही विशेष मेहनत घेतली यामध्ये फोटोग्राफी ओमकार कदम इयत्ता १० वी व प्रोजेक्टर ऑपरेटिंग अनुराग महाकाळ इयत्ता ९ वी यांनी केले.
शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडेचे अध्यक्ष सज्जाद अ. करीम सय्यद, सचिव समिर अ. रज्जाक सय्यद व खजिनदार वहाबभाई खलपे व सर्व सदस्य औद्योगीक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात या संस्थेमध्ये दाखल होण्यासाठी आवाहन केले व विद्यार्थ्यांना उत्तम करिअरसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.



