आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न

देवरुख दि. १३ ( प्रतिनिधी ):- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने समारंभाचा शुभारंभ झाला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विविध शालेय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व महाविद्यालयातील वार्षिक क्रीडा स्पर्धेत यशस्वी कामगिरी करणाऱ्या २५३ विद्यार्थी खेळाडूंना संस्था कार्यवाह शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे आणि जिमखाना प्रमुख प्रा.धनंजय दळवी यांनी सन्मानित केले.
समारंभाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. संदीप मुळ्ये यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयातील विविध विभागांचा शैक्षणिक-सहशैक्षणिक उपक्रम व कार्यक्रमांच्या अहवालाचे वाचन प्रा. धनंजय दळवी यांनी केले. बक्षीसांच्या यादीचे वाचन व वितरण सहाय्य प्रा. प्रवीण जोशी यांनी केले. वार्षिक क्रीडा स्पर्धेतील सांघिक खेळांमधील कबड्डी, खोखो, क्रिकेट, रस्सीखेच, व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजयी संघांना, तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारातील बुद्धिबळ, कॅरम, विविध मैदानी स्पर्धांमध्ये धावणे, उडी व फेकीचे प्रकार यामधील विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांनी सन्मानित केले.
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने उत्तम यश प्राप्त करणाऱ्या संघांना व खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेने सन्मानित केलेल्या संघामध्ये खो-खो(मुली) व व्हॉलीबॉल(मुले), तर यशस्वी विद्यार्थी खेळाडूंमध्ये साईराज आंब्रे(व्हॉलीबॉल व उंच उडी), सुहेल हरचिरकर(व्हॉलीबॉल), प्रीती सनगले व सिद्धी चोरगे(दोघी खो-खो), सार्थक आडशे(गोळा फेक), वेदांत गवंडी(१०० मी. धावणे) यांचा समावेश होता. या समारंभात वार्षिक क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद (ओव्हरऑल चॅम्पियनशिप) ११वी वाणिज्य- ‘ब’ या वर्गाला मान्यवरांनी बहाल करून सन्मानित केले. यानंतर पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, शालेय जीवनातील क्रीडा सहभागाचे महत्त्व व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्त्व, महाविद्यालयातील उपलब्ध क्रीडा सुविधा व संस्थेकडून मिळणारे प्रोत्साहन याबाबतचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी खेळाडूंना उपलब्ध असणाऱ्या करिअर संधी याबाबत प्रा. लुंगसे यांनी माहिती दिली.
प्रमुख अतिथी संस्था कार्यवाह शिरीष फाटक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माणूस निसर्गापासून दूर चालल्याने होत असलेले दुष्परिणाम विशद केले. विद्यार्थ्यांचे बालवयापासून मैदानापासून दूर होण्याने उद्भवणारे मानसिक व शारीरिक आजार याबाबतचा आढावा घेतला. खेळात आलेले आधुनिक तंत्रज्ञान व खेळातील सरावातील सातत्य याबाबत विवेचन करताना शासनाच्या क्रीडाविषयक योजना आणि महाविद्यालयात आरोग्य, शिक्षण व क्रीडा यासंबंधी असणाऱ्या सुविधा याबाबत विवेचन केले. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. समारंभात आभार प्रदर्शन प्रा. संदीप मुळये यांनी केले.
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली सर्व आकर्षक प्रमाणपत्र उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, ग्रंथपाल प्रा. सुभाष मांयगडे व सहाय्यक रोशन गोरूले यांनी तयार केली. या संपूर्ण समारंभाची पूर्व तयारी व आयोजनासाठी लेफ्टनंट प्रा. सानिका भालेकर, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. देवयानी जोशी, प्रा शिवराज कांबळे, प्रा. प्रवीण जोशी, क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. वसंत तावडे, अक्षय भुवड, सहाय्यक कैलास मेंगाल व रुणाली पवार, तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. या समारंभाला स्वराज्य मंडळ सचिव अन्वी प्रसादे व स्वराज्य मंडळातील सर्व सदस्य, तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, सुजाता प्रभूदेसाई यांनी समारंभाच्या उत्तम आयोजनासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



