रत्नागिरी

मांडकी-पालवण येथे आजपासून राज्यातील पहिले ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन

साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चिपळुणात

चिपळूण दि. १३ : तालुक्यातील मांडकी-पालवण येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने राज्यातील पहिले ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (ता. १४) तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दि.१५ रोजी समारोप समारंभाला उपस्थितीत राहणार आहेत.

मांडकी-पालवण येथील डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेच्या विस्तीर्ण क्रीडांगणावर तीन दिवस साहित्याचा जागर रंगणार आहे. ग्रामीण, कृषी व सहकार या विषयांवरील मराठी साहित्याची प्रथमच व्यापक मीमांसा या संमेलनाच्या माध्यमातून होणार असल्याने साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

ग्रंथदिंडीने होणार प्रारंभ

संमेलनाची सुरुवात शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता साहित्य संयोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने होईल. त्यानंतर आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता बाबूरावजी धोत्रे-पाटील यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सायंकाळी ६ वाजता स्थानिक कवींचे कवी संमेलन रंगणार आहे.

दिग्गजांच्या उपस्थितीत उद्घाटन

शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचे औपचारिक उद्घाटन होईल. उद्घाटक म्हणून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित राहतील.

संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. तानाजीराव चोरगे, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे उपस्थित राहतील. तसेच गृह राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, किरण सामंत, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

परिसंवादांची मेजवानी

१४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता ‘ग्रामीण साहित्यातील कोकण’ या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी सागर देशपांडे असतील. सहभाग पाटील, प्रसाद गावडे, सुभाष लाड, विजय हटकर, धीरज वाटेकर हे सहभागी होतील.

दुपारी २.३० वाजता ‘ग्रामीण साहित्य : काल, आज व उद्या’ या विषयावर डॉ. राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. प्रा. कृष्णात खोत, सौ. सुनिताराजे पवार, गजानन देसाई, राजीव बर्वे, प्रकाश होळकर, मधुकर पाटील सहभाग घेतील.

सायंकाळी ४.३० वाजता ग्रामीण कथाकथन, तर सायंकाळी ६ वाजता ‘सहकार साहित्य व सहकारातून समृद्धी’ या विषयावर प्रमोद कर्नाड यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. एस. एस. पाटील, डॉ. राजेंद्र सरकाळे, डॉ. मच्छींद्र मुरूडकर, प्रा. के. टी. जाधव, मंदार वर्तक सहभागी होतील. रात्री ७.३० वाजता ग्रामीण कवी संमेलनात दादा मडकईकर, विजय जोशी, गोविंद पाटील, संजय जगताप, नितीन चंदनशिवे, कल्पना दुधाळ, कैलास गांधी, बाबा परीट, अंजली बर्वे आदी कवी सहभागी होणार आहेत.

शेती, सहकार आणि आत्महत्यांवर मंथन

रविवार, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ‘कृषी साहित्य व शेती सुधारणा’ या विषयावर परिसंवाद होईल. डॉ. बाळासाहेब जमदग्नी, शेखर गायकवाड, रावसाहेब पुजारी, डॉ. जनार्दन कदम, कालिदास भजवळकर, प्राची जोशी सहभाग घेतील.

सकाळी १० वाजता सहकार तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची यमाजी माळकर मुलाखत घेतील. ११ वाजता ‘आता आत्महत्या थांबवूया…’ या विषयावर पद्मश्री पोपटराव पवार, कुलगुरू डॉ. शरद गडाख, पाशा पटेल, डॉ. जालिंदर पाटील, राजेंद्र कुंभार, जयदेव बर्वे, जयू भाटकर, विद्यानंद सागर, अरुण इंगवले सहभागी होणार आहेत.

दुपारी १२.३० वाजता ग्रामीण साहित्यिक तसेच कृषी व सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येईल. दुपारी २ वाजता प्रयोगशील शेतकरी विलास शिंदे, संजय माने, जयकुमार गुंडे, योगेश खराळे, हरिचंद्र देसाई, अंकुश चौगुले, संकेत कदम यांच्या यशोगाथा सादर होतील. दुपारी ३ वाजता समारोप समारंभ होईल.

संमेलनाचा समारोप दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार आहे. या वेळी ना. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, ना. उदय सामंत (पालकमंत्री), प्रा. मिलिंद जोशी (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ)विशेष निमंत्रितांमध्ये खासदार सुनील तटकरे यांच्यासह कोकणातील आमदार उपस्थित राहणार आहेत.

या ऐतिहासिक साहित्य संमेलनास जिल्हाभरातील साहित्यप्रेमी, शेतकरी, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संमेलनाचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे, संयोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखील चोरगे, कोषाध्यक्ष डॉ. अजय सावंत व सर्व मान्यवरांनी केले आहे.

मांडकी-पालवण येथे आजपासून साहित्य, शेती आणि सहकाराचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळणार असून चिपळूण तालुक्याच्या सांस्कृतिक इतिहासात या संमेलनाची नोंद विशेष ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button