माने अभियांत्रिकीचे वार्षिक स्नेहसंमेलन “आरोहण २ के २६” संपन्न

देवरुख दि. १२ (सुरेश सप्रे) :- तालुक्यातील प्र. शि. प्र. संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे २८ वे वार्षिक स्नेहसंमेलन “आरोहण २के२६” दिमाखात संपन्न झाले.
या कार्यक्रमाला डॉ. अभिषेक विचारे, डॉ. सुप्रिया गानू – डिचोलकर आणि आय डी एफ सी फस्ट बँकचे अंबरीश नटे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले . यावेळी संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, सीइओ प्रद्युम्न माने, मॅनेजर मानेज इंटरनॅशनल स्कूल ईशानी वाघ-माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, उपप्राचार्य डॉ. अनिरुद्ध जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते
सुरुवातीला प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यामध्ये महाविद्यालयातील वर्षभरातील मुख्य घडामोडी व उपक्रम, संस्थेने नुकतेच स्थापन केलेले नवप्रबोधन रिसर्च अँड इनक्युबेशनफाऊंडेशन’ (NRIF), परीक्षांचे निकाल, विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट, पुरस्कार, तसेच विविध विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या गौरवांकित कामगिरीचा विशेष उल्लेख केला. त्यांनी कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी साधलेल्या शैक्षणिक व आपआपल्या क्षेत्रातील प्रगतीबद्दल विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यानी कोणत्याही ट्रेंड्सच्या मागे न लागता मुलभूत गोष्टी, कौशल्य विकास व नवनवीन ज्ञान संपादन करण्याची सवय जोपासण्याचा सल्ला डाँ विचारे यांनी दिला.
तर विद्यार्थ्यांनी हॅकॅथॉन, वर्कशॉप सारख्या उपक्रमामधून सातत्याने सहभागी होण्याची आवश्यकता असून त्यामुळे शैक्षणिक कालावधी पूर्ण होईपर्यंत स्वतः उद्योग व्यवसायासाठी परिपूर्ण होता येते असे डॉ. गानू- डिचोलकर यांनी सांगितले
विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या सर्वांनी आपला राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयापासून सुरु झालेला प्रवास कथन करून आजपर्यंत मिळविलेल्या यशाचे गमक स्पष्ट केले.
आज विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचा आपल्याला अभिमान आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात. तुमच्या मार्गदर्शनातून त्यांना एक दिशा व नवे विचार मिळतीअसा विश्वास प्रद्युम्न माने यांनी व्यक्त केला
यानंतर कोइम्बतुर येथे या महिन्यात होणा-या गो कार्ट डिझाईन चॅलेंज सिझन तेरा या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी निघालेल्या महाविद्यालयाच्या टीम फुल थ्रोटलने बनवलेल्या गो कार्टचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रके व रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. महाविद्यालयाच्या विभागवार प्रथम येणा-या प्रत्येक विद्यार्थ्यास कै. इंदुमती माने अँवार्ड, प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास कै. राजेंद्र माने अँवार्ड तसेच सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याला चेअरमन अँवार्डस घोषित करण्यात आली. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा किताब कॉम्पुटर विभागातील वेदांत विकास आकटे याने पटकाविला . तसेच डॉ. अच्युत राऊत यांना बेस्ट रिसर्च पेपर अँवार्डने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम अव्हेल व प्रांजल सावंत या विद्यार्थ्यांनी तर प्रा. प्रियांका वनकर यांनी आभार प्रदर्शन केले.



