रत्नागिरी

कृतज्ञतेतून सृजनतेकडे: ‘क्रिएटिव्ह अल्युम्नी’तर्फे शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीचा कायापालट!

रत्नागिरी दि. ६ : – ज्या संस्थेने आपल्याला घडवले, त्या संस्थेचे ऋण फेडण्यासाठी ‘क्रिएटिव्ह अल्युम्नी’ ही माजी विद्यार्थ्यांची संघटना गेल्या दीड दशकापासून कटिबद्ध आहे. याच दातृत्वातून आता शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथील ‘सर विश्वेश्वरय्या उद्याना’च्या नूतनीकरणाचा संकल्प सोडण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य मा. सी. वाय. सीमीकेरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात करण्यात आला.

पंधरा वर्षांचा सेवेचा वारसा

‘क्रिएटिव्ह अल्युम्नी’ ही संस्था केवळ नावाला मर्यादित न राहता, गेल्या १५ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे. निव्वळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देणाऱ्या या संस्थेने आजवर अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केले आहेत:

आर.ओ. प्लांट व कुलर (१० लाख रुपये खर्च): विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून संस्थेने १० लाख रुपये खर्चून आर.ओ. फिल्टर प्लांट आणि ५ मोठे कुलर बसवले आहेत. याचा लाभ गेल्या ३ वर्षांपासून परिसरातील सुमारे २००० विद्यार्थी आणि शिक्षक घेत आहेत.

क्रीडा सुविधा : खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने परिसरात सुसज्ज अशी सिमेंटची क्रिकेट खेळपट्टी तयार केली आहे.

सामाजिक मदतीचा हात: आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेवण, शैक्षणिक पुस्तके आणि गणवेश वाटप असे उपक्रम गेली १० वर्षे अविरत सुरू आहेत.

उद्यान नूतनीकरणाने परिसराची शोभा वाढणार

भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या नावाने असलेल्या या उद्यानाचे नूतनीकरण करून ते अधिक निसर्गरम्य आणि प्रेरणादायी करण्याचा मानस संस्थेचा आहे. या उपक्रमामुळे कॅम्पसच्या सौंदर्यात भर पडणार असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक प्रसन्न जागा उपलब्ध होणार आहे. माजी विद्यार्थ्यांच्या या ‘रिटर्न टू रूट्स’ (मुळांकडे परतणे) भावनेचे आणि त्यांच्या कार्याचे शहर परिसरातून मोठे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button