महावितरणचे खरे ‘प्रकाशदूत’ : प्रामाणिक कर्तव्यामुळे उजळलेला प्रजासत्ताक दिन

जैतापूर दि. २ :- वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणचे अनेक कर्मचारी रात्रंदिवस, जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात. राजापूर तालुक्यात यापूर्वी घडलेल्या दोन-तीन दुर्दैवी घटनांत या ‘प्रकाशदूतां’ना आपला जीवही गमवावा लागला आहे. मात्र दुर्दैवाने, काही ठिकाणी कामचुकारपणा व कर्तव्य टाळाटाळ करणारे अधिकारी व कर्मचारीही असल्याने संपूर्ण यंत्रणेकडे संशयाने पाहिले जाते आणि त्याचा फटका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. काहींच्या निष्काळजीपणामुळे जीव धोक्यात घालून काम करणारे कर्मचारीही बदनाम होत असतात, ही बाब अत्यंत खेदजनक आहे.
अशा परिस्थितीतही कर्तव्यनिष्ठेचे आणि जबाबदारीचे उत्तम उदाहरण नुकतेच प्रजासत्ताक दिनी पाहायला मिळाले. धारतळे सब-स्टेशन अंतर्गत येणारा 11 के.व्ही. नाटे फिडर प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे सुमारे 2.30 वाजता अचानक ब्रेकडाऊन झाला. त्यामुळे ग्रामपंचायत नाटे, साखरी नाटे, आंबोळगड तसेच धाऊलवल्ली या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आणि प्रजासत्ताक दिन अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली.
मात्र महावितरण शाखा कार्यालय आडीवरे अंतर्गत कार्यरत असलेले प्रधान तंत्रज्ञ श्री. प्रकाश पालकर, तंत्रज्ञ श्री. अनिकेत चव्हाण आणि बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ श्री. योगेश कांबळे यांनी कोणतीही सबब न सांगता, रात्र, अंधार आणि धोक्याची तमा न बाळगता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एच.टी. लाईनच्या पोलवरील दोष शोधून त्यांनी रात्री सुमारे 3.30 वाजताच दुरुस्ती पूर्ण केली.
या प्रामाणिक आणि तत्पर सेवेमुळे सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व गावांचा वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला. शाखा अधिकारी श्री. भिसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी “प्रजासत्ताक दिन विना वीज साजरा होऊ नये” यासाठी दाखवलेली ही जबाबदारी निश्चितच उल्लेखनीय आहे.
महावितरणमध्ये काही मोजक्या कामचुकारांमुळे संपूर्ण यंत्रणा बदनाम होत असली, तरी अशा प्रसंगांतून हे स्पष्ट होते की आजही अनेक कर्मचारी निःस्वार्थपणे, प्रामाणिकपणे आणि जीवावर उदार होऊन काम करत आहेत. अशा कर्तव्यदक्ष ‘प्रकाशदूतां’चे कौतुक, प्रोत्साहन आणि संरक्षण होणे ही काळाची गरज आहे. कारण हेच कर्मचारी खऱ्या अर्थाने समाजाच्या अंधारात उजेड निर्माण करत आहेत.



