रत्नागिरी

रत्नागिरीतील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासवांची घरटी; १८,७३६ अंड्यांचे संवर्धन; ६६ पिल्ले सोडली समुद्रात

रत्नागिरी दि. २ :- कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरू असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे.

आतापर्यंत १७९ घरट्यांमधून १८ हजार ७३६ अंड्यांचे यशस्वीरीत्या संरक्षण करण्यात आले असून, अंड्यातून बाहेर पडलेली ६६ पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे, गुहागर येथे टॅगिंग केलेली चार कासवे पुन्हा अंडी घालण्यासाठी परतली असून, यामुळे कासव आपल्या मूळ स्थानीच अंडी घालण्यासाठी येतात, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

थंडीचा कडाका अन् विणीचा हंगाम जिल्ह्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून, हे वातावरण कासवांच्या विणीसाठी पोषक मानले जाते. यावर्षी कासव विणीचा हंगाम काहीसा लांबला आहे. मात्र, सध्या ज्या वेगाने कासवे किनाऱ्यांकडे येत आहेत, ते पाहता फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर अंड्यांचे संवर्धन होईल, असा अंदाज वन विभाग आणि कासव मित्र संस्थांनी व्यक्त केला आहे.

कासवांच्या स्थलांतराचा आणि त्यांच्या सवयींचा अभ्यास करण्यासाठी ‘टॅगिंग’ (खूण करणे) पद्धत वापरली जाते. गुहागर किनाऱ्यावर यापूर्वी टॅगिंग केलेली चार कासवे या हंगामात पुन्हा अंडी घालण्यासाठी परतल्याचे दिसून आले. एकदा अंडी घालून गेलेली कासवे पुन्हा त्याच किनाऱ्यावर येतात, हे यावरून अधोरेखित झाले असून संवर्धन मोहिमेचे हे मोठे यश मानले जात आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील ३५ किनाऱ्यांवर कासव संवर्धन मोहीम सुरू असली, तरी त्यातील आठ ठिकाणच्या किनाऱ्यांवर अद्याप एकही घरटे आढळलेले नाही. त्यात गुहागरमधील एका ठिकाणासह तवसाळ, ढोकमळे, जैतापूर, पूर्णगड, आडे, कर्दे, काळबादेवी, भाट्ये यांचा समावेश आहे. पुढील दोन महिने या किनाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. वन रक्षक आणि स्थानिक कासव मित्र रात्रंदिवस गस्त घालून या घरट्यांचे शिकारी व भक्षकांपासून संरक्षण करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button