सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा सायबर जागरूकता मोहीम रा.भा.शिर्के प्रशाला येथे उत्साहात संपन्न

रत्नागिरी दि. ३ ऑगस्ट:- गोगटे- जोगळेकर महाविद्यालय येथील सायबर वॉरियर क्लबतर्फे आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ” सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या सायबर जागरूकता मोहिमेअंतर्गत रा भा शिर्के प्रशाला येथे मुख्याध्यापक के.डी. कांबळे व उपमुख्याध्यापिका सौ.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात झाला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे, सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ज्ञान देणे तसेच जबाबदार आणि सजग डिजिटल नागरिक घडविणे हा होता.
या कार्यक्रमात “सायबर सुरक्षा ” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ओटीपी फसवणूक, फिशिंग, सोशल मीडिया फसवणूक, गेमिंग फ्रॉड, बनावट (फेक) लिंक, क्यू आर कोड फसवणूक, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता आणि सुरक्षित ऑनलाइन व्यवहार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसोबत संवादात्मक सत्र आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमात सायबर वॉरियर क्लबचे सदस्य स्नेहा भिडे, आर्या मोहित, राज गुरव, आयुष सनगरे, निरुपम मल्लिक, नैपुण्या खानविलकर, श्रवण बोथले, सृष्टी पाटील, गंधार चव्हाण, ऋग्वेद फडके यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक सावधगिरीचे उपाय, मजबूत पासवर्डचा वापर, ओटीपी व वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर न करणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी सायबर सुरक्षा शपथ घेत डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने, सुरक्षितपणे आणि सजगतेने वापर करण्याची प्रतिज्ञा केली.
” सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा ” ही मोहीम सायबर सुरक्षित भारत घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून विद्यार्थ्यांकडून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



