रत्नागिरी

मालगुंड येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता कामाचे भूमिपूजन!

पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना होणार थेट फायदा!

गणपतीपुळे दि. २ ऑगस्ट (वैभव पवार) :-  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना कामाचा भूमिपूजन समारंभ राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रविवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रत्नागिरी तालुका महसूल विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे अत्यंत नेटके नियोजन व आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रांताधिकारी जीवन देसाई ,तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी चेतन शेळके, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाळंद योजना विधानसभा क्षेत्र स्तरीय समिती रत्नागिरीचे अध्यक्ष प्रसाद उर्फ बाबूशेठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी, पंचायत समिती सदस्या पूर्वा दुर्गवळी, माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती साधना साळवी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी अरुण जाधव ,तलाठी राजेश वीर, सर्व महसूल कर्मचारी, विविध खात्यांचे प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालगुंड येथील जांभळी चा पऱ्या ते उपळट कैलास साळवी यांच्या बागेकडे जाणारा शेत पाणंद रस्ता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेतून होणार आहे या शेतपाणंद रस्त्यासाठी कोतवडे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य राजेश उर्फ राजू साळवी आणि रत्नागिरी पंचायत समितीच्या सदस्या पूर्वा दुर्गवळी यांचेसह स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ यांनी मागणी केली होती. ही मागणी आता पूर्णत्तवास जाणार असून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाल्यामुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या प्रस्तावित पाणंद रस्त्यामुळे सामाजिक व आर्थिक लाभ होणार असून मध्ये भातशेती क्षेत्रात अंदाजे ७.०० एकर मध्ये खत, बी- बियाणे, ने- आण करणे व काढणीनंतर भात पिकाची वाहतूक सुलभ होणार आहे. तसेच आंबा व काजू बागायती क्षेत्रामध्ये अंदाजे ३०.०० एकर मध्ये मोसमी फळांचे (आंबा /काजू ) बाग व्यवस्थापन व आंबा वाहतूक शक्य होणार आहे .तसेच सुमारे ७५ ते ८० शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात जाण्या- येण्यासाठी पक्का व वादमुक्त वहिवाटीचा रस्ता उपलब्ध होणार आहे.

तसेच मालगुंड दुर्गवळी वाडीतील लोकसंख्येपैकी सुमारे 300 नागरिकांची मुख्य रस्त्याशी कनेक्टिव्हिटी वाढेल व दैनंदिन दळणवळण सोपे होणार आहे. तसेच अंदाजे 40 ते 50 शालेय विद्यार्थ्यांसाठी पावसाळ्यात व नियमित शाळेत ये- जा करताना सुरक्षित तो चांगला रस्ता उपलब्ध होणार आहे. एकूणच या शेत पाणंद रस्त्यामुळे सुमारे 175 ते 180 शेतकरी आणि 40 ते 50 विद्यार्थ्यांचा थेट फायदा होणार आहे .त्यामुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button