रत्नागिरी

कोकणातील कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात संधी देण्यासाठी सिंधूरत्नच्या माध्यमातून प्रयत्न करणार : विनय नातू

पैसा फंडच्या कलादालनाला भेट

संगमेश्वर दि. ३ ऑगस्ट ( प्रतिनिधी ):- कोकणच्या ग्रामीण भागात विविध कलात असंख्य कलाकार दडलेले आहेत. या कलाकारांची कला रसिकांसमोर येण्यासाठी आणि या कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात संधी मिळवून देण्यासाठी आपण सिंधुरत्नच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करणार आहोत. व्यापारी पैसा फंड संस्थेने संगमेश्वर येथे उभारलेले कलादालन हे कलाकारांना प्रोत्साहन देणारे ठरत असून येथे ठिकठिकाणाहून असंख्य कलारसिक भेट देतात ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सिंधूरत्न समितीचे उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केलं.

संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कुल मधील कला विभागाने उभारलेल्या कला दालनाला डॉ. विनय नातू यांनी भेट देवून पहाणी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे, उदय करमरकर, बडद, सुवारे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रशालेच्या कलाविभागा तर्फे कलेची आवड असणारे विद्यार्थी उच्च कलाशिक्षण घेण्यासाठी जावेत यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याचे कौतुक करुन कलादालनातील कलाकारांच्या कलाकृतींची स्तुती केली. सर्वच कलाकृतींची बाराकाईने पाहणी करताना संगमेश्वर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रथितयश चित्रकार कै. अरुण पाथरे यांच्या कलाकृती पाहून डॉ. नातू अचंबित झाले. पाथरे यांच्या विषयी आदर व्यक्त करुन डॉ. नातू यांनी त्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेतली.

व्यापारी पैसा फंड संस्थेने कला विषयाला खूप मोठं महत्व देवून ग्रामीण भागात दडलेल्या बालकलाकारांना आपल्या उपक्रमातून प्रोत्साहित केल्या बद्दल व्यापारी पैसा फंड संस्थेचे कौतुक करुन अभिनंदन केलं. याप्रसंगी व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते डॉ. विनय नातू यांचा शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

प्रशालेचा माजी विद्यार्थी चित्रकार हेमंत सावंत याने बालभारती साठी तिसरीच्या पुस्तकात चित्र रेखाटल्या बद्दल धनंजय शेट्ये यांच्या हस्ते त्याचाही सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी, सहशिक्षक विनोद ढोर्लेकर, सेवक अनंत जाधव उपस्थित होते. पैसा फंड संस्थेच्या कला क्षेत्रातील योगदानाची आपण सिंधुरत्नच्या माध्यमातून नक्कीच दखल घेऊ असे आश्वासन डॉ. विनय नातू यांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button