रत्नागिरी

कोकणचा निसर्ग कलाकृतीतूनही रसिकांना भुरळ घालतो : डॉ. राजश्री वऱ्हाडी

संगमेश्वर दि. २३ ( प्रतिनिधी ):- कला पुष्कर गांग्रई ता. चिपळूण येथे ” राज रंग रेखा ” वर्कशॉप मध्ये विविध ३२ नामवंत कलाकारांनी रेखाटलेल्या कोकणच्या निसर्गाच्या अप्रतिम छटा पाहून मन तृप्त होते. कोकणचा निसर्ग कलाकृतीतूनही रसिकांना भुरळ घालतो याची अनुभूती या प्रदर्शनात घेता आली, असे प्रतिपादन युनिव्हरसिटी ऑफ लॉ च्या प्रमुख डॉ. राजश्री वऱ्हाडी यांनी केले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादामी येथील कलादालनात आयोजित गांग्रई कला प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कला दालनात शुक्रवारी सायंकाळी ५:३० गांग्रई येथील कार्यशाळेतील कलाकृतीच्या प्रदर्शनाचे उदघाटन वऱ्हाडी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रदर्शनाचे आयोजक ज्येष्ठ शिल्पकार – चित्रकार प्रकाश राजेशिर्के, कला अकादमी संचालक मीनल जोगळेकर, शिल्पकार रोहन पवार, चित्रकार विष्णू परीट, जनार्दन खोत, राजेंद्र महाजन, निलेश शीळकर, जयेंद्र गोहील, भावेश पटेल, बुद्धभूषण सपकाळे, संयोगिता खोत, रचना नगरकर, मकरंद राणे, अर्पिता पवार, शिल्पकार विशाल गोवळकर, चित्रकार प्रकाश महिंदकर, छायाचित्रकार शिरीष कराळे, वर्षा कराळे, सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव आदि मान्यवर उपस्थित होते.

गांग्रई चित्र प्रदर्शनात देशातील ३२ नामवंत चित्रकारांच्या ६४ पेक्षा अधिक कलाकृती कला रसिकांना पाहता येणार आहेत. यां कला प्रदर्शनातील प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र शैली हीच या कलाकाराची खरी ओळख आहे. नामवंत कलाकारांनी रेखाटलेला निसर्ग हा कोकणचा आहे, हे या चित्राकृतीतून आपोआप अधोरेखित होते, ही कोकणच्या निसर्गाची आणि त्याच्या रंगांसह वेगळेपणाची ताकद आहे.

चित्रप्रदर्शनाच्या उदघाटनानंतर कलारसिकांचा या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चित्र पहाणारा रसिक प्रत्येक कलाकृती पुढे थांबून चर्चा करत होता, कलाकृती समजून घेत होता आणि सारी रचना पाहून थक्क होत होता. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत जणू कोकण अवतरल्याचे पहायला मिळाले. या प्रदर्शनाला कलाकृती रेखाटलेले कलाकार प्रत्यक्ष हजर असल्यामुळे कलारसिकांना त्यांच्या जवळ प्रत्यक्ष संवाद साधून कलाकृती अधिक सजगतेने समजून घेता आली.

कलाकारांना कोकण भावलं 

देशभरातून आलेल्या ३२ कलाकारात रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकार होतेच. मात्र देशाच्या विविध भागातून आलेल्या कलाकारांना कोकणचा निसर्ग भावला. हे कलाकार येथील निसर्गाजवळ एकरूप झाले आणि त्यांनी एका पेक्षा एक थक्क करणाऱ्या कलाकृती रेखाटल्या. गांग्रई येथे संपन्न झालेली ही दुसरी कलाकार्यशाळा होती. भविष्यातही अशा कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे.

-प्रकाश राजेशिर्के ज्येष्ठ शिल्पकार – चित्रकार आणि कार्यशाळा आयोजक

आमच्यासाठी आनंदाची अनुभूती

आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार प्रकाश राजेशिर्के सर यांनी गांग्रई येथे आयोजित केलेली कला कार्यशाळा म्हणजे आमच्यासाठी आनंदाची विलक्षण अनुभूती होती. या कला पुष्कर राज रंग रेखा कला कार्यशाळेतून आमचा आत्मविश्वास अधिक वाढला असून दिग्गज कलाकारांकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.

– अर्पिता पवार, चित्रकार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button