न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे – न्या. प्रसन्न वराळे

रत्नागिरी दि. ६ :- निःपक्षपाती न्यायाकरीता न्यायाधीश आणि वकिल यांचेवर अधिक जबाबदारी आहे. अंतिमतः समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. संविधान अमृतमहोत्सव निमित्त “आपण राज्य घटना कशी वापरतो याकडे लक्ष देण्याची गरज आहे या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इशाऱ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे ” असे मला प्रामाणिकपणे वाटते असे प्रतिपादन न्या. प्रसन्न वराळे यांनी रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे आयोजित संविधान अमृतमहोत्सव सोहळ्यात उद्घाटन प्रसंगी काढले.
या कार्यक्रमाला न्या. प्रसन्नजी वराळे, सर्वोच्च न्यायालय न्या.श्रीराम मोडक, ॲड मिलिंद साठे, महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता, आणि मा. विनोद जाधव, रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश, आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागतानंतर पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. सर्वप्रथम प्रमुख जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव यांनी आपल्या मनोगतात भारतीय संविधानातील तरतुदी आणि जिल्हा न्यायालयाच्या स्तरावर दिले जाणारे न्यायनिर्णय यांच्यात कशी सांगड घातली जाते, यावर सुलभ आणि मार्गदर्शक भाष्य केले.
यानंतर महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपले मनोगत मांडले. स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनाक्रम, इंडियन इंडिपेन्डन्स अॅक्ट, विविध चळवळी व उठाव, तसेच २६ जानेवारी १९४९ रोजी स्वीकारण्यात आलेल्या भारतीय संविधानापर्यंतचा प्रवास त्यांनी थोडक्यात पण नेमक्या शब्दांत उलगडला. पुढे त्यांनी संविधान स्वीकारल्यानंतर १९७७ पर्यंत सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांनी दिलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्यामागील संविधानिक आकलन यावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी विशेषतः केशवानंद भारती प्रकरण आणि ए.डी.एम. जबलपूर प्रकरण यांचा संदर्भ देत न्यायव्यवस्थेतील बदलते प्रवाह अधोरेखित केले.
त्यानंतर न्या. श्रीराम मोडक यांनी संविधानातील मूलभूत अधिकारांबरोबरच मूलभूत कर्तव्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी संविधानाच्या अनुच्छेद ५१(क) चा उल्लेख करताना, नागरिकांनी आपल्या अधिकारांची अपेक्षा ठेवताना देशाप्रती असलेली कर्तव्ये कितपत पार पाडली आहेत, याचाही आत्मपरीक्षणपूर्वक विचार करण्याचे आवाहन केले. न्या. प्रसन्न वराळे यानी आपल्या वैयक्तिक अनुभवांच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची, त्यांच्या सहवासाची आणि त्यांच्या सामाजिक दृष्टीची आठवण करून दिली. गोलमेज परिषदांमधील बाबासाहेबांचे विचार, हिंदू कोड बिल, अस्पृश्यतेविरुद्धचा लढा यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला. तसेच सध्याच्या सामाजिक परिस्थितीत समाज व न्यायव्यवस्था यांच्यात निर्माण होत असलेल्या विसंगतींकडे सूचक शब्दांत लक्ष वेधून, अधिकारांबरोबर कर्तव्यांची जाणीव करून देणारे व्यापक मार्गदर्शन त्यांनी केले.
प्रास्ताविक बारचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी केले. संविधान निर्मिती प्रक्रियेत महिलांचे योगदान इतिहासात अनेकदा दुर्लक्षित राहिले आहे, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले. तसेच सन १९१५ पूर्वीच लोकमान्य टिळकांनी भारतीय संविधान अभ्यासले होते याचा संदर्भ दिला. संविधान राष्ट्राची कोनशिला असून आपण ते कसे वापरतो यावर त्याचे मूल्य अवलंबून राहील असे प्रतिपादन ॲड. विलास पाटणे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ॲड. रत्नदीप चाचले यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. अवधूत काळंबटे यांनी केले.



