माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

पुणे दि. ६ : माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी ( वय-८१) यांचे आज मंगळवारी पहाटे निधन झाले. सुरेश कलमाडी यांच्यावर गेल्या काही काळापासून दीर्घकालीन आजारामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.
सुरेश कलमाडी यांनी आपल्या कार्यकाळात राजकीय जबाबदाऱ्यांबरोबरच भारतीय ऑलिम्पिक महासंघाचं अध्यक्षपदही भूषवले होते याशिवाय ते प्रदीर्घ काळ पुण्यातून खासदार म्हणून निवडून जात होते.
पुण्याच्या राजकारणावर सुरेश कलमाडी यांनी एकेकाळी पूर्ण प्रभाव राखला होता. पण राजकारणात येण्याआधी सुरेश कलमाडी हे १९६४ ते १९७२ या काळात भारतीय हवाई दलात पायलट म्हणून कार्यरत होते. १९७४ साली ते सेवेतून निवृत्त झाले आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत झाले. तिथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९९५ ते १९९६ या काळात काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारमध्ये त्यांनी रेल्वे खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही कार्यभार पाहिला होता.



