रत्नागिरी

मारुती कॉमन क्लबतर्फे सुवर्णमहोत्सवी माघी गणेशोत्सवात रंगारंग कार्यक्रम

रत्नागिरी दि. ११ : खालची आळी येथील मारुती कॉमन क्लबतर्फे माघी गणेशोत्सवाचे आयोजन २२ ते २९ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. मंडळाचे माघी उत्सवाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. उत्सवात कालावधीत भाविक व रसिकांसाठी कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे.

उत्सवाची सुरुवात २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ‘श्रींची आगमन मिरवणूक’ पुणे येथील सुप्रसिद्ध प्रभात ब्रास बँड यांच्या सुमधुर वादनाने होणार आहे. २२ जानेवारी रोजी पहाटे प्राणप्रतिष्ठापना, सकाळी श्री सत्यनारायण पूजा व सायंकाळी सार्वजनिक मंडळ व मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. रात्री ८ वाजता श्रींची आरती व मंत्रपुष्पांजलीनंतर ९.३० वाजता रूपाली करमरकर यांचा विठू रंग हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

२३ जानेवारीला सायंकाळी ४.३० वाजता बागेश्री भजन मंडळाचे भजन, रात्री ९ वाजता ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत केंद्रस्तरीय प्रथम पारितोषिक विजेते समर्थ रंगभूमीचे ‘अग्निपंख’ सादर करण्यात येणार आहे. यात कलाकार ऋचा भुते, मिनार पाटील, चैत्राली लिमये, सुशांत केतकर, साक्षी बने, संतोष गार्डी, सुशील जाधव व कौशल मोहिते आहेत. २४ जानेवारीला रात्री ९ वाजता भरत नाट्यमंडळ, पुणे प्रस्तुत रणजीत देसाई लिखित संगीत नाटक ‘हे बंध रेशमाचे’ यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार *चारुदत्त आफळे* यांची विशेष भूमिका असणारे नाटक रंगमंचावर सादर होईल. यात प्रमुख भूमिका गौरी पाटील, श्रद्धा सबनीस, अभय जबडे, राजन कुलकर्णी, विश्वास पांगारकर, कौशिक कुलकर्णी, अनुष्का आपटे, ऋषिकेश बडवे यांच्या आहेत. २५ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता श्रीगणेश याग, सायंकाळी ५ वाजता हळदीकुंकू होईल. रात्री ९ वाजता कलारंग नाट्य प्रतिष्ठान, वरवडे, खंडाळा प्रस्तुत व प्रा. वसंत कानेटकर लिखित, नितीन जोशी दिग्दर्शित संगीत नाटक ‘मृत्युंजय’ सादर होणार आहे. यामध्ये कलाकार नितीन जोशी, अरुण जोशी, केतन गोगटे, संतोष दामले, विवेक गोखले, मधुरा लाकडे, हर्षाली केळकर व स्वप्नील गोरे आहेत. २६ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता माजी सैनिकांचा सत्कार सोहळा व प्रबोधन असा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात सौ. अनुराधाताई प्रभुदेसाई (अध्यक्ष, लक्ष्य फाउंडेशन) व कर्नल केदार अशोक परांजपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. २७ जानेवारीला रात्री ९ वाजता सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा अभंग-भक्तिसंगीताचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

२८ जानेवारीला ८ वाजता सकाळी श्री सत्यनारायण पूजा, सायंकाळी तीर्थप्रसाद व रात्री ९.३० वाजता मारुती कॉमन क्लब महिला मंडळ ‘अनुभव’ (वीण नात्यांची) हा कार्यक्रम व विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर होणार आहे. उत्सवाचा २९ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता श्रींची विसर्जन मिरवणूक काढून भक्तिभावात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. उत्सवकाळात दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत आरती होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button