रत्नागिरी

जिल्हास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत ‘आठल्ये- सप्रे-पित्रे’ महाविद्यालयाचा किरण टक्के द्वितीय

देवरुख दि. २९ ( प्रतिनिधी ) :- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयाचा विद्यार्थी किरण चंद्रकांत टक्के(तृतीय वर्ष, वाणिज्य) याने प्रभावी कविता सादरीकरणातून आपली वेगळी ओळख निर्माण करत जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. कोकण मराठी विभाग परिषद आणि नवनिर्माण कॉलेज, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ नोव्हेंबर, २०२५ रोजी या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धेत एकूण २२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पहिल्या चार स्पर्धकांची निवड करून त्यांना सन्मानपत्र व पुस्तक प्रदान करण्यात आले, तसेच रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनात स्वरचित कविता सादर करण्याची सुवर्णसंधी प्रदान करण्यात आली.

किरण टक्के याने जिल्हा साहित्य संमेलनात मान्यवर कवीं आणि रसिक श्रोत्यांसमोर आपली ‘कसे जगावे बागेतल्या फुलाने’ ही संवेदनशील आणि स्त्रीप्रधान विषयाला उजाळा देणारी कविता अत्यंत प्रभावी शैलीत सादर केली. सादरीकरणादरम्यान त्याला श्रोते व कवी मंडळींकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, तर काव्य संमेलनाचे(काव्य मैफिल) अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी भूषविले होते.

किरण टक्के याने मिळवलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी त्याचे अभिनंदन करून, त्याचा गौरव केला. विद्यार्थी किरण टक्के याने मिळवलेले यशाबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी यशाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button