गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे वाणिज्य व व्यवस्थापन, लेखशास्त्र व वित्त, आणि अर्थशास्त्रावर आंतरराष्ट्रीय परिषद

रत्नागिरी दि. २७ :- गोगटे- जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे पीएम-उषा अंतर्गत एक दिवसीय बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषद “वाणिज्य व व्यवस्थापन, लेखाशास्त्र व वित्त, आणि अर्थशास्त्र यांवरील जागतिक संवाद” या शीर्षकावर हायब्रीड मोडमध्ये म्हणजेच ऑफलाइन व ऑनलाइन अशा पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे.
ही परिषद शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर, २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता हॉटेल विवा एक्झिक्युटीव्ह, मारुती मंदिर येथे सुरू होणार आहे. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी एजुकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह श्री. श्रीकांत दुदगीकर आदी उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीतील प्रतिथयश उद्योजक श्री. दीपक गद्रे यांची उपस्थिती असेल. त्याचप्रमाणे पीएम उषा समन्वयक डॉ. पांडुरंग बर्कले, कोकण रिजन, महाराष्ट्र राज्य यांचीही उपस्थिती लाभणार आहे. परिषदेमध्ये बीजभाषण देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक व वक्ते म्हणून मलेशिया येथील डॉ. अनबीया खैरील तसेच भारतातील डॉ. केतन वीरा यांची उपस्थिती असेल.
ही परिषद संशोधक विद्यार्थी प्राध्यापक विविध क्षेत्रातील विद्वान तसेच उद्योजक व व्यावसायिकांना नाविन्यपूर्ण कल्पना आणि जागतिक दृष्टिकोनांची देवाणघेवाण करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. या परिषदेमध्ये जगातील विविध देश आणि भारतातील विविध राज्यांमधील संशोधक, विद्वान, उद्योजक व व्यावसायिक, प्राध्यापक व विद्यार्थी असे मिळून एकूण ३५० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे एकूण ८० पेक्षा जास्त विविध विषयांवरील शोधनिबंध सादर केले जाणार आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर हे या परिषदेचे निमंत्रक असून वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, डॉ. रुपेश सावंतदेसाई, डॉ. सीए. अजिंक्य पिलणकर हे सह-निमंत्रक आहेत.



