चित्रकार विक्रांत बोथरे यांच्या चित्राची ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

संगमेश्वर दि. ३० ( प्रतिनिधी ):- कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय ‘सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट’ने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १३४ व्या ऑल इंडिया वार्षिक कला प्रदर्शनासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि प्रसिद्ध चित्रकार प्रा. विक्रांत बोथरे यांच्या कलाकृतीची निवड झाली आहे. भारताच्या कलाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या प्रदर्शनात निवड होणे, हा सह्याद्रि शिक्षण संस्थेसाठी मोठा बहुमान मानला जात आहे.
बॉम्बे आर्ट सोसायटी ही आशियातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित कला संस्था आहे. यावर्षीच्या १३४ व्या प्रदर्शनासाठी देशभरातून हजारो ऑनलाइन प्रवेशिका दाखल झाल्या होत्या. त्यातून निवडक आणि दर्जेदार कलाकृतींची निवड तज्ज्ञ परीक्षकांमार्फत करण्यात आली. या कडक स्पर्धेतून प्रा. विक्रांत बोथरे यांच्या चित्राने आपले स्थान निश्चित केले आहे.’डिवाइन एनर्जी विथ नेचर’ संकल्पना
प्रा. बोथरे हे केवळ एक कुशल चित्रकार नसून ते लेखक आणि उत्तम मार्गदर्शकही आहेत.
बोथरे यांनी जी डी आर्ट, डिपेएड आणि इंटिरियर डीझाईनर अशा पदव्या संपादन केल्या आहेत. पोर्ट्रेट, कॉम्पोजिशन, ॲबस्ट्रॅक्ट आणि लँडस्केप या सर्व विषयांवर त्यांचे प्रभुत्व आहे. पेन्सिल, चारकोलपासून ते वॉटर कलर, ॲक्रेलिक आणि ऑइल कलरपर्यंतच्या सर्व माध्यमांत ते लीलया संचार करतात.त्यांना असलेल्या आध्यात्मिक ओढीतून आणि सखोल वाचनातून निसर्ग आणि दैवी ऊर्जा ही वैशिष्ट्यपूर्ण चित्रमालिका आकारास आली आहे. आध्यात्मिक ऊर्जा आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाफ त्यांनी या चित्रातून साधला असून, याच मालिकेतील चित्राची निवड या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी झाली आहे.
या यशाबद्दल सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सौ. पूजाताई निकम, अनिरुद्ध निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव तसेच सर्व प्राध्यापक वृंदाने प्रा. विक्रांत बोथरे यांचे अभिनंदन केले आहे. प्रा. बोथरे यांच्या या यशामुळे कोकणातील कलाक्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांसाठी ते एक प्रेरणास्थान ठरले आहेत.
“निसर्गातील अदृश्य दैवी शक्ती चित्रांच्या माध्यमातून मांडण्याचा माझा हा प्रयत्न आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीसारख्या प्रतिष्ठित मंचावर या चित्राची निवड होणे ही माझ्यासाठी आणि आमच्या सह्याद्री कला महाविद्यालयासाठी आनंदाची गोष्ट आहे.”
– प्रा. विक्रांत बोथरे (चित्रकार)



