रत्नागिरी

“कोकण विजय – मेनू 2026” कॅम्प : एनसीसी कॅडेट्सची सागरी वारसा जपण्याची, स्वच्छतेची आणि साहसी प्रशिक्षणाची प्रभावी मोहीम

जैतापूर दि. १६ (राजन लाड) :- २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीतर्फे राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारा राज्यस्तरीय “कोकण विजय – मेनू 2026” कॅम्प यंदाही कोकण किनारपट्टीवर उल्लेखनीय सामाजिक कार्य, पर्यावरण जनजागृती आणि सागरी वारसा संवर्धन यासाठी विशेष ठरला आहे.

हा कॅम्प NCC महाराष्ट्र निर्देशकाच्या मार्गदर्शनाखाली, तसेच भारतीय नौदलाची पश्चिमी कमांड आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या सहकार्याने आयोजित केला जातो. एनसीसीच्या नेव्हल विंग अंतर्गत ‘MENU – Most Enterprising Naval Unit’ कार्यक्रमाचा हा महत्त्वाचा भाग आहे.

कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या ६० एनसीसी कॅडेट्सनी पावस, रणपार, पूर्णगड, आंबोळगड, धाउलवल्ली आणि विजयदुर्ग परिसरात स्वच्छता जनजागृती मोहीम राबवली. “स्वच्छ कोकण – समुद्र कोकण” या घोषवाक्यासह त्यांनी किनारपट्टीच्या स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादर केले. स्थानिक नागरिकांनी कॅडेट्सच्या सामाजिक बांधिलकीचे मनापासून अभिनंदन केले.

आज जैतापूरच्या रविवार आठवडा बाजारातही कॅडेट्सनी प्रभावी पथनाट्य सादर केले. प्लास्टिकमुक्त परिसर, समुद्री पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक संपत्ती जतन याविषयी केलेल्या त्यांच्या सादरीकरणाने बाजारातील नागरिकांची वाहवा मिळवली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात प्रभावीपणे पोहोचवण्यात कॅडेट्स यशस्वी ठरले.

कॅम्पदरम्यान रॅपेलिंग, ट्रेकिंग आणि इतर साहसी उपक्रम तसेच समुद्री प्रशिक्षणही पार पाडण्यात आले. एनसीसीच्या प्रशिक्षण पद्धतीनुसार अशा उपक्रमांमुळे कॅडेट्समध्ये शिस्त, धैर्य, टीमवर्क आणि नेतृत्वगुण दृढ होतात. विजयदुर्ग किल्ल्याच्या भेटीदरम्यान कॅडेट्सनी भारतीय नौदलाचा इतिहास, समुद्री सुरक्षा, तसेच कोकणाच्या सागरी परंपरेची माहिती घेतली. पर्यावरण रक्षण, प्लास्टिकमुक्त पर्यटनस्थळे आणि नैसर्गिक वारसा जपण्याबाबत त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

या संपूर्ण उपक्रमात भारतीय नौदल अधिकारी, कोस्टगार्ड अधिकारी, तसेच आयईएस शाळा व्यवस्थापन व स्थानिक ग्रामस्थ यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. कॅम्पचा सहावा दिवस सुरू असून कॅडेट्सनी आज विजयदुर्गहून धाउलवल्ली–आंबोळगड परिसराकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे.

“या कॅम्पमुळे कॅडेट्समध्ये देशप्रेम, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सागरी वारसा जपण्याची भावना आणि सामाजिक बांधिलकी मोठ्या प्रमाणात दृढ होते,” असे अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button