
रत्नागिरी दि. २९ :- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी “एकता दौड” (Run for Unity) चे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा उद्देश भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला अभिवादन करणे तसेच राष्ट्रीय एकात्मता, ऐक्य व सामूहिक शक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आहे.
ही “एकता दौड” (Run for Unity) दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.00 वा. पोलीस परेड मैदान, रत्नागिरी येथून प्रारंभ होणार आहे. या दौडीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते होणार असून या दौड मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या दौडीचा मार्ग पुढील प्रमाणे आहे पोलीस परेड मैदान (सुरुवात) जेल रोड चौक → जयस्तंभ भाटये ब्रिज भाटये समुद्र किनारा व परत भाटये ब्रिज जयस्तंभ→ जेल रोड चौक पोलीस परेड मैदान (समाप्ती).
या कार्यक्रमात पोलीस कर्मचारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी, होमगार्ड्स, विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या दौडदरम्यान वैद्यकीय सहाय्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवून राष्ट्रीय ऐक्य, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश दृढ करावा.



