कृषीरत्नागिरी

आजीची रानभाजी : लाल भोपळा अन् आंबुशी!

‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक..’ या कथेतून या भोपळ्याची तशी बालपणीच ओळख झालेली आहे. थोडे कळू लागल्यावर या भोपळ्याची पिवळी, केसरी फोड बाजारात सतत पहायला मिळालेली. शिवाय गोड घारगे खायला कोणाला आवडणार नाहीत..तो रुचकर पदार्थही यापासूनच बनवला जातो.

आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे लाल भोपळा आणि आंबुशी..

लाल भोपळा हे एक वेलवर्गीय फळ आहे. त्याच्या पानांची तसेच फळाची भाजी बनवली जाते. त्याचबरोबर भोपळ्याची खीर आणि पराठे बनवले जातात. भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे फळ गोलाकार असते. यात खूप बिया असतात. फळाचे वजन ४ ते ८ किलोपर्यंत असू शकते. सर्वात मोठी प्रजाती मैक्सिमाचे वजन ३४ किलोपेक्षा जास्त असते. हे संपूर्ण जगात लावले जाते. मोठ्या आजारानंतर शरीर कमजोर झाले असल्यास आहारात भोपळा घेतला पाहिजे. काही दिवसांनी थकवा दूर होतो.

भोपळा हृदयरोगींसाठी खूप फायदेशीर आहे. तो कोलेस्ट्रॉल कमी करतो. भोपळा उष्णता कमी करणारा आणि लघवीला उत्तेजन देणारा आहे. तसेच पोटाच्या समस्या दूर करतो. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो. भोपळ्याला आरोग्यवर्धक मानले जाते. भोपळ्यामध्ये बीटा कॅरोटीन असते, ज्यामुळे व्हिटॅमिन ‘ए’ मिळते. पिवळ्या आणि केशरी रंगाच्या भोपळ्यामध्ये कॅरोटीनचे प्रमाण जास्त असते. भोपळ्याच्या बिया आयर्न, झिंक, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहेत. जगभरात भोपळ्याचा उपयोग केला जातो, म्हणून 29 सप्टेंबरला ‘पम्पकिन डे’ साजरा केला जातो.

आंबुशी

याला आंबुटी, आंबाती, आंबटी, भुईसपटी आदी स्थानिक नावाने ओळखले जाते. आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. पचनस हलकी असून, चांगली भूकवर्धक आहे. आंबुशीच्या अंगरसाने धमण्यांचे संकोचन होऊन रक्तस्राव बंद होतो. चामखीळ आणि नेत्रपटलाच्या अपारदर्शकतेत पानांचा रस बाह्य उपाय म्हणून वापरतात. ताज्या पानांची कढी पाचक आहे.आंबुशी वाटून सुजेवर बांधल्यास दाह कमी होतो व सूज उतरते. धोतऱ्याचे विष चढल्यास आंबुशीचा रस उतारा म्हणून देतात. कफ आणि वातात आंबुशी गुणकारी आहे.

प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते;                            जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button