सह्याद्री नगर ते मोहल्ला रस्ता दिवाळीपर्यंत तातडीने दुरुस्त करण्याची आम. शेखर निकम यांची ग्वाही
शहर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने याबाबत दिले निवेदन

देवरूख दि. २२ (सुरेश सप्रे) :- देवरूख शहराचे प्रवेशद्वार असलेला बाजीराव पेशवे उद्यान – बाजारपेठ ते मुस्लिम मोहल्ला हा मुख्य रस्ता दिवाळीपर्यंत तातडीने दुरुस्त करण्यात येईल अशी ग्वाही आम. शेखर निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर व पंकज पुसाळकर यांनी दिली.
देवरूख शहरात येणाऱ्या मुख्यरस्त्यावरील खड्ड्यांचे शुक्लकाष्ठ संपण्याचे चिन्ह दिसत नसुन चोरपऱ्या ते बसस्थानक या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुख्यरस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे . मुख्यरस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यान्मुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन देवरुखशहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी आम. शेखर निकम यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देत चर्चा केली
शहरातील अनेक रस्त्याच्या कामासाठी आम. निकम यांनी वेगवेगळ्या निधीतून देवरूख नगर पंचायतीला लाखों रुपयांचा निधी दिला त्यातून शहरातील रस्त्यांची कामे करण्यात आली होती. त्यानंतर पावसाळ्यातच शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले त्यावर झालेली मलमपट्टीही पुन्हा पावसात वाहुन गेल्याने शहरवासियांना या खड्ड्यांच्या शुक्लकाष्ठातून मुक्तता व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर यांचे नेतृत्वाखाली आम. निकम यांची भेट घेत वस्तूस्थिती दाखवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पडलेल्या खड्ड्यांवर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली. याची दखल घेत चोरपऱ्या- पंचायत समिती ते एसटी बसस्थानक ते मशिद हा रस्ता दिपावली पर्यंत हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
आ. निकम यांना निवेदन देताना शहर अध्यक्ष हनिफशेठ हरचिरकर, बाळुशेठ ढवळे, पंकज पुसाळकर, नितीन भोसले, प्रफुल्ल भुवड, बंडू जाधव, दीपक खेडेकर, रविंद्र लाड, पदाधिकारी उपस्थित होते.



