
वणौशी दि. ७ सप्टेंबर (सागर गोवळे) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालय, दापोली यांच्या ‘ग्रामीण जागृकता कार्यानुभव’ (RAWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषी स्नेही’ गटातर्फे वणौशी येथे १% बोर्डो मिश्रण तयार करणे व त्याचा योग्य वापर करण्याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले.
फळबागांचे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी असलेल्या बोर्डो मिश्रणाची निर्मिती या वेळी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्यात आली.

बोर्डो मिश्रण निर्मितीची सोपी पद्धत: १०० ग्रॅम मोरचूद ५ लिटर पाण्यात आणि १०० ग्रॅम चुना वेगळ्या ५ लिटर पाण्यात विरघळवून दोन्ही द्रावणे तयार केली. त्यानंतर मोरचुदाचे द्रावण चुन्याच्या द्रावणात हळूहळू ओतत सतत ढवळून १० लिटर पाण्याचे १% बोर्डो मिश्रण तयार करण्यात आले.
गुणवत्ता चाचणी: द्रावण योग्य बनले आहे की नाही हे तपासण्यासाठी स्वच्छ लोखंडी विळ्याची चाचणी घेण्यात आली. विळ्यावर तांबूस थर आल्यास द्रावणात अतिरिक्त चुना मिसळण्याची पद्धत शेतकऱ्यांना समजावून सांगितली.
नारळ पिकातील वापर: तयार द्रावणाची नारळाच्या बुंध्याभोवती मुळांच्या परिसरात आळवणी (drenching) करून प्रात्यक्षिक दाखवले. तसेच कळी व शेंड्याच्या संरक्षणासाठी आणि बुरशीजन्य रोगांच्या (उदा. कळी कुज, पानावरील ठिपके) व्यवस्थापनासाठी याचे महत्त्व स्पष्ट केले.
बोर्डो मिश्रण हे संरक्षक संपर्क बुरशीनाशक असून ते वनस्पतीच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करते, ज्यामुळे बुरशीच्या बीजाणूंची उगवण रोखली जाते. नारळ, सुपारी, आंबा, काजू, द्राक्षे आणि लिंबूवर्गीय पिकांमध्ये शिफारशीनुसार याचा वापर फायदेशीर ठरतो.
हे प्रात्यक्षिक यशस्वी करण्यासाठी समृद्धी जाधव, निलम मदने, तन्वी नादिवडेकर, श्रुती बोबडे, साक्षी लोके, अंकिता मुंज, सलोनी सावंत, कोमल झिरवाळ, श्रावणी मोरे आणि आकांक्षा गाडगे या कृषीकन्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोककुमार चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. परेश पोटफोडे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला. या प्रात्यक्षिकामुळे वणौशीतील शेतकऱ्यांना फळबाग संरक्षणाची अत्यंत उपयुक्त आणि प्रत्यक्ष माहिती मिळाली.



