रत्नागिरी

अश्वमेध ग्रंथालयाचे साहित्य क्षेत्रातील योगदान अभिमानास्पद : धनंजय तडवळकर

राजधानी साताऱ्यात पराडकर यांच्या चपराक प्रकाशित ऋतुरंगचा गौरव; राज्यस्तरीय अक्षरगौरव पुरस्काराचे वितरण

संगमेश्वर दि. २५ ऑगस्ट ( प्रतिनिधी ) :- सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय गेली १४ वर्षे राज्यातील साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्य कृतीना राज्यस्तरीय अक्षरगौरव पुरस्कार देवून सन्मानीत करत आहे. लिहित्या हातांचा सन्मान करणे आणि यामध्ये सलग चौदा वर्षे सातत्य राखणे हे कौतुकास्पद आहे. म्हणूनचअश्वमेध ग्रंथालयाचे साहित्य क्षेत्रातील योगदान अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी – गझलकार धनंजय तडवळकर यांनी केले.

सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय आणि वाचनालयाच्या वतीने दरवर्षी कै. भास्करराव माने राज्यस्तरीय अक्षरगौरव साहित्य पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या सातारा येथील सोमण सभागृहात संपन्न झालेल्या अक्षर साहित्य गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून तडवळकर हे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ कवियत्री ज्योत्स्ना चांदगुडे, वाचनालायचे संस्थापक रवींद्र भारती, अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने, कार्यवाह शशिभूषण जाधव, श्रीधर साळुंखे आदि मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित दोन्ही मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा अश्वमेधच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देवून सन्मान करण्यात आला. अश्वमेधचे संस्थापक रवींद्र भारती यांनी ग्रंथालय कार्याचा आढावा घेताना सांगितले की, आमचे ग्रंथालय विनाअनुदानित असले तरी वर्षभरात आम्ही विविध उपक्रम घेत असतो. गेली १४ वर्षे राज्यातील साहित्यिकांना पुरस्कार देण्यामध्ये माने कुटुंबियांचे योगदान खूप मोठे आहे. प्रास्ताविकात डॉ. राजेंद्र माने म्हणाले की, यावर्षी अश्वमेधकडे एकूण १२३ ग्रंथ पुरस्कारासाठी प्राप्त झाले. निवड समितीने कस लावून विविध विषयावरील ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड केली. यातील काही पुस्तकांचा डॉ. राजेंद्र माने यांनी विशेष उल्लेख केला. आमची पुरस्काराची रक्कम छोटी असली तरी, अधिकाधिक साहित्यिकांना पुरस्कार दिले जावेत, असा आमचा यामागील प्रामाणिक हेतू असल्याचे डॉ. माने यांनी स्पष्ट केलं.

गेली ११ वर्षे दर रविवारी एक लेख लिहिणारे आणि चपराक प्रकाशनच्या माध्यमातून आजवर चौदा पुस्तकांची निर्मिती करणारे संगमेश्वर येथील लेखक जे. डी. पराडकर यांच्या ‘ ऋतुरंग ‘ या कोकणातील फुलांविषयीच्या रंगीत पुस्तकाला अश्वमेधचा राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल उपस्थितांच्या हस्ते त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना जे. डी.पराडकर म्हणाले की, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून पुस्तकाची निर्मिती करणारे चपराक प्रकाशन, संपादक घनश्याम पाटील, मुखपृष्ठ रेखाटणारे चित्रकार विष्णू परीट, पुस्तकासाठी प्रस्तावना देणारे डॉ. उमेश मुंडल्ये पाठराखण करणाऱ्या तत्कालीन कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे आणि सर्व वाचक यांचा आहे. ऋतुरंग या आगळ्यावेगळ्या रंगीत पुस्तकाची अश्वमेध ग्रंथालयाने दखल घेतल्याबद्दल पराडकर यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्यावर भव्य ग्रंथाची निर्मिती करणारे ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकीहाळ यांनी आपल्या मनोगतात दर्पणकारांवरील ग्रंथ निर्मिती करताना आलेल्या सर्व अनुभवांचे सविस्तर कथन करुन यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या पुढील अनेक पिढ्याना हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल असेही त्यांनी नमूद केलं. दर्पणकारांवरील या भव्य आणि अभ्यासपूर्ण ग्रंथ निर्मितीसाठी अश्वमेध ग्रंथालयाने रवींद्र बेडकीहाळ यांना सन्मानित केल्याबद्दल त्यांनी अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने आणि संस्थापक रवींद्र भारती यांना मनापासून धन्यवाद दिले.

राज्यस्तरीय अक्षरगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या राज्यभरातील एकूण १३ लेखक आणि कवींना सन्मानपत्र आणि मानाचा पटका देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व पुरस्कार प्राप्त लेखक कविना आपल्या पुस्तका विषयी मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली, ही बाब विशेष कौतुकास्पद होती. सर्वांनी अश्वमेध ग्रंथालयाला धन्यवाद देवून कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांनी आपल्या मनोगतात अश्वमेध ग्रंथालयाच्या उपक्रमांचे कौतुक करुन डॉ. राजेंद्र माने यांनी आपले वडील कै. भास्करराव माने यांच्या स्मृती प्रित्यर्थ साहित्य पुरस्कार देण्याचा सुरु केलेला उपक्रम अन्य वाचनालय आणि संस्था यांच्यासाठी अनुकरणीय असल्याचे नमूद केलं.लेखक आणि कविनी आता वर्तमान काळात घडणाऱ्या गंभीर घटनांवर भाष्य करणारं लेखन करावं असे आवाहन करुन ज्योत्स्ना चांदगुडे यांनी आपली एक अप्रतिम कविता सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. श्रीधर साळुंखे सर यांनी लक्षात राहील असं आभार प्रदर्शन केलं तर, कार्यक्रमाचे नेटकं आणि ओघवत्या शैलीतील सूत्रसंचालन कविता प्रभुणे यांनी केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button