
रत्नागिरी दि. ३ सप्टेंबर : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची दखल घेत रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष यिंका बाबालोला तसेच रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर Flt. Lt. K.P. Nagesh यांच्या हस्ते क्लबचा विशेष सत्कार करण्यात आला.
गोवा येथे आयोजित रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक च्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे, एकाच महिन्यात रोटरी इंटरनॅशनलच्या सर्वोच्च नेतृत्वातील दोन मान्यवरांच्या हस्ते सन्मान मिळणे ही क्लबच्या कार्याची उल्लेखनीय पावती मानली जात आहे.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे, सचिव आनंद चौगुले , प्रेसीडेंट इलेक्ट माधुरी कळंबटे तसेच लवकरच स्थापन होणाऱ्या रोटरी क्लब ऑफ राजापूरचे प्रशांत पवार, शशांक संसारे आणि निखिल जाधव उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शिक्षण, कृषी,अंमली पदार्थमुक्त जनजागृती,तसेच गरजू घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी सातत्याने समाजसेवेचा वसा पुढे नेत आहे.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीला हा आंतरराष्ट्रीय नेतृत्वाकडून मिळणारा गौरव रत्नागिरीसाठी अभिमानाची बाब असून क्लबच्या सदस्यांमध्ये नव्या उमेदीने आणि अधिक व्यापक स्वरूपात समाजोपयोगी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करणारा आहे.



