रत्नागिरीत २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान ‘संस्कृत सप्ताह’ महोत्सव उत्साहात साजरा होणार!

रत्नागिरी दि. २५ ऑगस्ट : संस्कृतभारती दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने रत्नागिरी नगरात दिनांक २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये ‘संस्कृत सप्ताह’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने संस्कृतप्रेमींसाठी विविध आकर्षक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
या महोत्सवाचा प्रारंभ २५ ऑगस्ट रोजी शालांतर्गत निवडक १० सुभाषितांच्या पठणाने होत आहे. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी बाळासाहेब ठाकरे युथ ॲक्टिव्हिटी सेंटर, साळवी स्टॉप येथे नगर संस्कृतदिनोत्सव साजरा केला जाईल. या कार्यक्रमात रत्नागिरीच्या नगराध्यक्षा मा. शिल्पाताई सुर्वे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून शालेय विद्यार्थ्यांचे प्रतिभा प्रदर्शन आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन असे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल. नगरसेवक श्री. सौरभ मलुष्टे व नगरसेविका सौ. पूजाताई पवार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.
२७ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह, शिवाजीनगर (शिवाजी नगर आयटीआय जोडरस्ता) येथे नारायणी पठण मंडळाच्या भगिनींद्वारे कृष्णासंबंधित स्तोत्रांच्या पठणाचा ‘कृष्णरंग’ हा कार्यक्रम सादर होईल. २८ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने संस्कृतभारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, कोकण प्रांताचे विद्वत्परिषत्प्रमुख आणि गोवा येथील शिक्षक मा. महाबलजी भट्ट ‘धन्यो गृहस्थाश्रम:’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. गूगल मीटच्या माध्यमातून हा कार्यक्रम होईल.
महोत्सवाच्या उत्तरार्धात, दि.२९ ऑगस्ट रोजी ल. वि. केळकर वसतिगृह, जोशीपाळंद येथे सुरू असलेल्या संस्कृत संभाषण शिबिराचा समापन कार्यक्रम शिबिरस्थानी पार पडेल. ३० ऑगस्ट रोजी माधवराव मुळे भवन, झाडगाव येथे ‘संस्कृतगीतसंध्या’ हा विशेष कार्यक्रम होणार असून, यात प्रसिद्ध गायिका सौ. मुग्धा भट सामंत मराठीतील प्रसिद्ध भक्तीगीते व नाट्यगीते यांच्या संस्कृत अनुवादित गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमात श्री. हेरंब जोगळेकर हे तबलासाथ व कु. श्रीरंग जोगळेकर हे संवादिनी साथ करणार आहेत. तसेच ३१ ऑगस्ट रोजी अधिवक्ता परिषद व संस्कृतभारती यांच्या संयुक्त विद्यमाने रंजन मंदिर, शिर्के प्रशाला, माळनाका येथे ॲड. अविनाश फणसेकर यांचे ‘प्राचीन भारतीय न्यायव्यवस्था’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.
संस्कृतभारती दक्षिण रत्नागिरीतर्फे रत्नागिरीतील सर्व संस्कृतप्रेमी व नागरिकांना या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाचा आस्वाद घेण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.



