देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत सौ.गोदूताई जांभेकर विद्यालय प्रथम

रत्नागिरी दि. २० ऑगस्ट : लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, रत्नागिरी यांच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम’ या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल १६ संघांनी सहभाग घेतला होता.
विशेष अभिमानाची बाब म्हणजे विद्यालयात संगीत विषयाचे स्वतंत्र शिक्षक नसतानाही तसेच विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत अथवा गायनाचे बाह्य प्रशिक्षण मिळत नसतानाही विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले.
ग्रामीण भागातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताचे प्रभावी आणि सुरेल सादरीकरण करून परीक्षकांची मने जिंकली. या यशातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते कोणत्याही व्यासपीठावर उत्तम कामगिरी करू शकतात, याचा प्रत्यय आला.
या गीतासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे साठे सर, नाटेकर मॅडम तसेच पांचाळ सर यांचे विशेष योगदान लाभले.
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिका संजना तारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून विद्यार्थी कलाकारांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
“सुविधांची कमतरता कधीच गुणवत्तेच्या आड येत नाही; जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यशाची शिखरे गाठता येतात,” हे या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
या विजयामुळे सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला असून विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.



