आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालय, देवरुखचे ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांना अमरावती विद्यापीठाची पीएच.डी.

देवरुख दि. १९ ऑगस्ट ( प्रतिनिधी ):- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष सोनू मायंगडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. वाशिम येथील श्री. रामराव सरनाईक सोशल वर्क कॉलेजच्या संशोधन केंद्रातून त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले असून, प्रा. डॉ. संजय मधुकरराव साळवे, ग्रंथपाल, श्री. रामराव सरनाईक सोशल वर्क कॉलेज, वाशिम यांचे त्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले.
प्रा. डॉ. मायंगडे यांच्या संशोधनाचा विषय “Adoption of Artificial Intelligence in Library Services in Indian Institutes of Technology (IIT’s) in India: A Study” अर्थात “भारतातील भारतीय तंत्रज्ञान संस्थांच्या (IIT’s) ग्रंथालय सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब : एक अभ्यास” असा आहे. या संशोधनातून ए. आय. मुळे ग्रंथालय सेवा अधिक जलद, अचूक, स्वयंचलित आणि वापरकर्ताकेंद्रित करता येतात, असे स्पष्ट झाले आहे. तसेच ए. आय. प्रशिक्षण, तांत्रिक पायाभूत सुविधा, संस्थात्मक पाठिंबा, वापरकर्ता-जागरूकता डेटा सुरक्षा आणि नैतिकता या बाबी ए. आय. स्वीकारण्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. भविष्यातील ए. आय. आधारित ग्रंथालय सेवांसाठी दिशादर्शक आराखडा देण्याचा प्रयत्न या संशोधनातून करण्यात आला आहे. या संशोधनासाठी विविध आय.आय.टी. मधील ग्रंथपाल, ग्रंथालय कर्मचारी व वापरकर्त्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
प्रा. डॉ. सुभाष मायंगडे यांचा शैक्षणिक प्रवास रत्नागिरी जिल्ह्यातील भोके मायंगडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झाला. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, भोके मायंगडेवाडी येथे, माध्यमिक शिक्षण पंचशील ज्ञानपीठाचे माध्यमिक विद्यालय, करबुडे-लाजूळ येथे, तर अकरावी-बारावीचे शिक्षण अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, रत्नागिरी येथे झाले. पुढील उच्च शिक्षण त्यांनी पुण्यात पूर्ण करून पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यांनी यूजीसी- नेट आणि सेट या दोन्ही पात्रता परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या आहेत.
प्रा. डॉ. मायंगडे यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात पुण्यातील International Institute of Technology (I2IT) येथे कार्यालय व ग्रंथालय विभागातून झाली. तेथे त्यांनी १२ वर्षे अविरत सेवा बजावली. या काळात त्यांना फिनोलेक्स ग्रुपचे चेअरमन स्व. श्री. प्रल्हादजी छाब्रिया तसेच संस्थेच्या प्रमुख मा. डॉ. अरुणा कटारा यांचे सहकार्य लाभले. त्यानंतर गेल्या ११ वर्षांपासून ते आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रंथालय सेवा विकसित करण्यासाठी ते विविध वाचन उपक्रम, पुस्तक प्रदर्शने आणि डिजिटल ग्रंथालयीन सेवा राबवित आहेत.
ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रात त्यांच्या नावावर १४पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन लेखांचे प्रकाशन व सादरीकरण झाले आहे. ते इंडियन लायब्ररी असोसिएशनचे आजीवन सभासद असून विविध कार्यशाळा, सेमिनार, परिषद, स्वयम अभ्यासक्रम आणि रिफ्रेशर कोर्सेसमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच ग्रंथालयातील पुस्तके व मुद्रित साहित्याच्या निर्जंतुकीकरणासाठी विकसित केलेल्या “Portable Book Sanitizing Chamber” या अभिनव उपकरणाच्या बाह्य रचनेसाठी त्यांच्या डिझाईनला पेटंट प्राप्त झाले आहे.
प्रा. डॉ. मायंगडे यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गाने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. भोके मायंगडेवाडीतील छोट्याशा शाळेपासून सुरू झालेला प्रा. डॉ. मायंगडे यांचा शैक्षणिक प्रवास पीएच. डी. पदवीपर्यंत पोहोचणे ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कामगिरी ठरली आहे.



