आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा
...अन्यथा आर.पी.आय (आठवले) चा लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

विल्ये दि. २८ जुलै (अमित कांबळे) :- रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्याकडे लेखी निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रितमजी रुके, सेक्रेटरी आदेशजी मर्चंडे, जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या निवेदनात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने असे म्हटले आहे की राज्य सरकार बदर समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा कुटील डाव करीत आहे या निर्णयामुळे अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पडण्याची शक्यता असून सामाजिक न्याय आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वांना धक्का पोहोचू शकतो. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातींना दिलेल्या घटनात्मक आरक्षणाचा उद्देश ऐतिहासिक अन्याय दूर करून समाज संधी उपलब्ध करून देणे हा होता. त्यामुळे अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय हा समाज हिताच्या विरोधात आहे.

निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे:-
१) अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय त्वरित थांबविण्यात यावा.
२) बदर आयोग ताबडतोब रद्द करण्यात यावा.
३) अनुसूचित जातीच्या घटनात्मक हक्कांचे व आरक्षणाचे संरक्षण व्हावे.४) कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुसूचित जातीच्या सर्व समाज घटकांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये.
५) नीट पेपर फुटी परीक्षेबाबत सरकारने गंभीरतेने लक्ष घालावे.
६) सरकारने जाहीर केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफीची त्वरित अंमलबजावणी करावी.
तरी सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचा आदर करून अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय ताबडतोब रद्द करण्यात यावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.
त्यावेळी कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, युवक कोकण प्रदेश अध्यक्ष सुशांत सकपाळ, जिल्हा अध्यक्ष प्रितम रुके, सरसिटणीस आदेश मर्चंडे, राहुल जाधव, सुरेंद्र तांबे, विलास कांबळे, प्रा. उरुणकर, विक्रांत कदम, उज्वल कांबळे, दीपक कांबळे, ॲड.श्रुती कांबळे, तृप्ती कांबळे, दीप्ती कांबळे तसेच रत्नागिरी तालुका जिल्हा पदाधिकारी ज्येष्ठ सदस्य युवक कार्यकर्ते मान्यवर पदाधिकारी, उपस्थित होते.



